आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने सहा तालुक्यांतील आठ गावे आणि २५ वाड्यांना टंचाईची झळ बसत असल्याने नागरिकांची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामध्ये दहा खासगी आणि एक सरकारी टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पोलादपूर तालुक्याला बसत आहे. पेण, मुरुड, कर्जत, रोहे आणि पोलादपूर तालुक्यांतही नागरिकांना पाण्याची चणचण भासत आहे.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आलेले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी, जलसाठ्यातील पाणी आटत आहे. प्रत्येक गावातील आणि वाड्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करूनही शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळत नसल्याने नागिराकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या-वस्त्यांवरील महिलांचीही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. काही भागांमध्ये रात्र-रात्र पाण्यासाठी जागावे लागत आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाईच्या आराखड्यावर नजर टाकल्यास शहरी भागांमध्ये सध्यातरी पाण्याचा प्रश्न अगदीच गंभीर झाल्याचे दिसून येत नाही.कर्जत तालुक्यातील तीन गावे आणि सहा वाड्यांवर पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने तेथील नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबावी, यासाठी प्रशासनाने एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. पेण तालुक्यातील एक गाव आणि आठ वाड्यांमधील पाणीटंचाई निवारण्यासाठी एका सरकारी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहे तालुक्यात एका वाडीवर एक टँकर, पोलादपूर दोन गावे, दहा वाड्यांवर दोन टँकर, मुरुड, तळा तालुक्यातील एका गावासाठी प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.>पाण्यासाठी कोट्यवधींची कामेजलयुक्त शिवार यशस्वीपणे राबवल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा सरकारसह प्रशासनाने केला आहे, त्यामुळेच डिसेंबरअखेर सुरू होणारी पाण्याची टंचाई एप्रिल महिन्यात होत आहे, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. नजीकच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये धरणांची दुरुस्ती, नळपाणी पुरवठा योजनांची डागडुजी, विंधण विहिरी निर्माण करणे, धरणातील गाळ काढणे, अशी विविध कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पाण्याची भीषणता कमी झालेली दिसेल, असाही दावा त्यांनी केला आहे.>सरकार आणि प्रशासनाने पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तसेच प्रस्तावित धरणे बांधल्यास जिल्ह्यातील पाण्याची समस्या कमी होणार आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत खारेपाट विभागात पाण्यासाठी काम करणाऱ्या एकविरा ग्रुप या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्वरूप कोठेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डोंगरांच्या उतारावर छोटे-छोटे बंधारे बांधून पाणी अडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. असेच कार्य प्रत्येक गावातील नागरिकांनी समाज उद्धारासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
सहा तालुक्यांत आठ गावे, २५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:35 AM