न्यायालयात हजर राहण्याचे आदेश नाहीत
By admin | Published: June 19, 2017 05:07 AM2017-06-19T05:07:30+5:302017-06-19T05:07:30+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी जेटीच्या बनावट कागदपत्राचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सध्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी जेटीच्या बनावट कागदपत्राचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आमदार जयंत पाटील यांना कोर्टात हजर राहण्याबाबत सांगितलेच नसल्याचा दावा आमदार जयंत पाटील यांचे वकील अॅड. सचिन जोशी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
अलिबाग तालुक्यातील पीएनपी जेटीच्या परवानगीसाठी आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांनी सरकारी बोगस कागदपत्रे तयार केल्याची फिर्याद शहाबाज येथील ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना दिले होते. याप्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आदेश काढले नसल्याचे अॅड. जोशी यांनी सांगितले. ‘माझे पक्षकार बाहेरगावी गेले असल्याने त्यांनीच दिलेल्या तोंडी सूचनेनुसार मी अॅड. सचिन जोशी वकील म्हणून त्यांच्यावतीने न्यायालयात हजर होत आहे.’ पुढील तारखेस वकीलपत्र दाखल करण्यात येईल, असे अॅड. जोशी यांनी सांगितले. तसेच न्यायालयाने पुरशीस दाखल करून घेवून ती मान्य केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये सुरू आहे. त्यामुळे यामध्ये कोण दोषी आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.