रानसईतील जखमींवर उपचार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:32 AM2017-08-02T02:32:06+5:302017-08-02T02:32:06+5:30
रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई : रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे; परंतु रानसईमधील नागरिकांवर मात्र अद्याप उपचार करण्यात आले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कर्नाळा किल्ल्याच्या समोरील डोंगरावर उरण तालुक्यातील रानसई आदिवासीपाड्यांमध्ये कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. उपचार न मिळाल्याने, या दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सात जणांवरही अद्याप योग्य उपचार करण्यात आलेले नाहीत. त्या सर्वांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत, तर एखाद्याची प्रकृती खालावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु रायगड जिल्हा परिषदेचे डॉक्टर अद्याप रानसईमध्ये गेलेले नाहीत. आदिवासींनी नक्की उपचारासाठी कोठे जायचे, याविषयीही त्यांना कोणीच मार्गदर्शन केलेले नाही. दोघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचा बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मयत अनिकेत शिंगवा शिक्षण घेत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेतील व्यवस्थापनाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची कार्यवाही सोमवारीच सुरू केली आहे. मंगळवारीही विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून कोणाला काही बाधा होऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे; परंतु ज्या आदिवासीपाड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्या पाड्यांमध्ये मात्र नागरिकांना अद्याप प्रतिबंधात्मक लस देण्यात न आल्याने नाराजी वाढू लागली आहे.