माणगाव : सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असले, तरीही काही ठिकाणी गणेशोत्सवाच्या पारंपरिक प्रथा सुरू आहेत. कोकणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे, परंतु माणगाव तालुक्यातील साले गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही. तरीही येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अनेक वर्षांपासून सुरू असून, ती यंदाही जपण्यात आली
गणेशोत्सव म्हणजेच कोकणचा सर्वात आवडता सण. गणेशोत्सवात येथे उत्साह ओसंडून वाहत असतो. गणरायाचे आगमन होते आणि मग पूजाअर्चा, आरती नाचगाणी सारी धमाल असते, परंतु यंदा या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. असे असले, तरी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साले गावाने आपली परंपरा जपली आहे. जवळपास सव्वाशे उंबऱ्यांच्या या गावातील एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ मंदिरात जमतात. तिथून वाजतगाजत गणपतीची पालखी निघते. मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगा तलावातून ही पालखी मिरवणूक काढली जाते. गावातील हा आगळावेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला, हे आजच्या पिढीलाही माहिती नाही. मात्र, वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा आजच्या पिढीनेही जपली आहे. गावात घरोघरी या पालखीचे आगमन होते.
माहेरवाशीण या दिवशी न विसरता गावात येऊन गणरायाची मनोभावे पूजा करतात. त्यानंतर, पुन्हा मंदिरात या पालखी मिरवणुकीने सांगता होते. साले गावच्या ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे ही परंपरा जपली असून, ती नक्कीच अनुकरणीय आहे.