महाराष्ट्रात मोदींची लाट दिसत नाही- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:35 AM2019-04-20T00:35:58+5:302019-04-20T00:36:20+5:30
प्रचारानिमित्त २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो होतो, तेव्हा मोदींची लाट दिसत होती.
नागोठणे : प्रचारानिमित्त २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो होतो, तेव्हा मोदींची लाट दिसत होती. त्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीनिमित्त आता फिरत असताना ही लाट जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या मित्रपक्षांची लाट उसळली असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील तरुणाई तेव्हा भाजपच्या प्रचाराला भुलली, तेव्हा हा प्रकार घडला होता. आज बहुतांशी तरुण मतदार आमच्या मागे उभा असल्याने महाआघाडीच सत्तेवर येणार, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागोठण्यात व्यक्त केला.
महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची जाहीर सभा गुरुवारी सायंकाळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गांधी चौकात पार पडली, त्या वेळी मुंडे बोलत होते. पंतप्रधान मोदी सपनोंके सौदागर असून त्यांनी दिलेल्या अच्छे दिनची आता चेष्टा व्हायला लागली आहे.
आज निवडणुका नसत्या तर, पेट्रोलच्या किमतीने आता सेंच्युरीच गाठली असती. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या राज्यात असणारी पेट्रोल व गॅसची किंमत व आताची किंमत याची तुलना करता पाच वर्षांत आपले किती वाढीव पैसे गेले याचे गणित केले, तर आपल्याला रात्रभर झोपच लागणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणून संबोधित असल्याने इमानदारीने चौकीदार म्हणून नोकरी करणारा चौकीदार, बदनाम व्हायला लागला आहे असा आरोप करताना मुंडे यांनी मोदींनी केलेल्या पापाचे वाटेकरी शिवसेना सुद्धा असल्याचे स्पष्ट केले.
या मंत्रिमंडळात असणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत विधिमंडळात कायम आवाज उठवला असून अनंत गीते यांनी रायगडच्या जनतेला आतापर्यंत काय दिले आहे, याचे उत्तर द्यावे अशी मागणी मुंडे यांनी या वेळी केली. सुनील तटकरे यांच्या नावाचे आणखी दोन उमेदवार उभे करावे लागतात, हीच विरोधकांची नाचक्की असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. या सभेला आ. धैर्यशील पाटील, आ. अनिकेत तटकरे, रोहे तालुका काँग्रेस अध्यक्ष मारुती देवरे, माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, राष्ट्रवादीचे नेते शिवराम शिंदे, दिलीपभाई टके, तानाजी देशमुख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.