रायगड जिल्ह्यात पाेस्ट काेविड सेंटरचा पत्ताच नाही, रुग्णांची गैरसाेय टाळण्यासाठी केले जातात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:50 AM2020-12-24T00:50:45+5:302020-12-24T00:51:01+5:30
Raigad : सरकारी रुग्णालयांतील डाॅक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून विविध उपाय सुचविले जात आहेत. दरम्यान, काेराेनाने स्वतःमध्ये जणूकीय बदल करीत ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे.
रायगड : काेराेना हाेऊन गेलेल्या रुग्णांना पुन्हा काेराेनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘पाेस्ट काेविड सेंटर’ अशी संकल्पना पुढे आली आहे. मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अशी व्यवस्थाच नसल्याने बरे झालेल्या कोविडरुग्णांचे हाल हाेत आहेत.
सरकारी रुग्णालयांतील डाॅक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून विविध उपाय सुचविले जात आहेत. दरम्यान, काेराेनाने स्वतःमध्ये जणूकीय बदल करीत ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे. आधीच्या विषाणूपेक्षा बदललेला काेराेना ७० टक्के अधिक संसर्ग वेगाने पसरवित असल्याने पुन्हा एकदा जगाची झाेप उडाली आहे. त्यामुळे ज्यांना काेराेना हाेऊन गेलेला आहे त्यांच्यासह सर्वांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सरकार आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काेराेना हाेऊन गेलेल्यांना दम लागणे, थकवा येणे, केस गळणे यासह अन्य तक्रारी जाणवत आहेत. अशा रुग्णांनी सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधल्यास संबंधित डाॅक्टरांकडून त्यांना याेग्य ताे उपचार देण्यात येत आहे. ज्यांना काेराेना हाेऊन गेला त्यांच्याशी प्रशासकीय पातळीवरून संपर्क साधला जात नसल्याचे जिल्ह्यामध्ये चित्र आहे
काय काळजी घेतली जाते
ज्यांना काेराेना हाेऊन गेला आहे आणि त्यांना पुन्हा त्रास जाणवत आहे असे रुग्ण रुग्णालयामध्ये येतात किंवा फाेन करतात. ज्यांना रुग्णालयामध्ये उपचार देणे गरजेचे आहे त्यांना भरती करण्यात येते. कमी त्रास असणाऱ्यांना याेग्य ती औषधे घेण्यास सांगितले जाते. अशा रुग्णांनी सकस आहार घ्यावा, व्यायाम करावा, फळे, हिरव्या भाज्या यांचे सेवन करावे, असा सल्ला त्यांना दिला जाताे.
काही दिवसांपूर्वी ज्यांना काेराेना हाेऊन गेला होता आणि पुन्हा त्रास जाणवत आहे अशा सहा रुग्णांनी संपर्क साधला हाेता. त्यांच्यावर याेग्य ते उपचार करण्यात आले. काेराेनातून बाहेर पडल्यानंतर पुढील तीन महिने काळजी घेणे गरजेचे आहे. अति श्रमाची कामे करणे त्यांनी टाळावे आणि सकस आहाराचा जेवणात समावेश करावा.
- डाॅ. विक्रमजीत पडाेळे,
वैद्यकीय अधिकारी