नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात भरणार दुकाने, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:19 AM2017-09-14T06:19:27+5:302017-09-14T06:19:46+5:30
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक बाह्य रुग्ण सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून १० वर्षांपूर्वी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लौकिक होता. येथील सुविधांकडे प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
- संजय गायकवाड
कर्जत : रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक बाह्य रुग्ण सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून १० वर्षांपूर्वी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लौकिक होता. येथील सुविधांकडे प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीपासून सेवा देण्यापर्र्यंत सर्व बाबतीत मागे पडलेल्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आता दुकाने थाटली जात आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्या दुकानांच्या भाड्याने सलाईन आणि औषधे खरेदी करण्यासाठी ती दुकाने बांधली जात असून त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत कुठेही नोंद नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रु ग्णांना सेवा देण्यात कमी पडत असलेल्या दवाखान्याला लागून दुकाने या कल्पनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
एका व्यक्तीने दान केलेल्या जमिनीवर रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नेरळ येथील प्राथमिक केंद्र उभे आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यातील आघाडीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आज समस्यांच्या गर्तेत आहे. रु ग्णालयात मुख्य जबाबदारी असलेले आणि पदभार असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश गवळी हे गेली अनेक वर्षे बदली डॉक्टर म्हणून नेरळ दवाखान्यात कार्यरत आहेत. नेरळ रेल्वे स्टेशन आणि एसटी स्थानकाच्या जवळ असल्याने कायम गर्दीने ओसंडून वाहत असलेल्या या दवाखान्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने आज रु ग्णांना सुविधा मिळत नसल्याने रु ग्णांची वाट पाहावी लागत आहे. शवविच्छेदन केंद्र गेली दोन वर्षांपासून बंद असल्याने अपघात किंवा अन्य कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह कर्जत येथे न्यावे लागत आहेत. या रु ग्णालयात गेली दीड वर्षे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या बंद असल्याने अशा मातांना खाजगी ठिकाणी किमान ८-१० हजार खर्चून अशी शस्त्रक्रि या करून घ्यावी लागत आहे. रु ग्णांना प्रसंगी जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ येते हे अनेक रु ग्णांनी अनेकदा अनुभवले आहे. सफाई कर्मचाºयांपासून वैद्यकीय अधिकाºयांची वानवा असलेल्या या रु ग्णालयातील प्रभारी अधिकाºयांचे प्रमुख म्हणून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी हे पद गेल्या सहा वर्षांपासून रिक्त आहे. एमबीबीएस डॉक्टर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या दवाखान्यात यायला तयार नाहीत अशी विचित्र स्थिती मागील काही वर्षात निर्माण झाली आहे. एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी यांचे पद राज्य शासनाच्या आरोग्य संचालक यांचे कार्यालय देत असते, त्यांना नेरळसारख्या महत्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने एमबीबीएस झालेले डॉक्टर स्वखुशीने येताना दिसत नाहीत.
गाळे बांधताना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राने अशी दुकाने थाटताना रायगड जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्याचवेळी कर्जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून त्या कामाचे मूल्यांकन देखील घेण्यात आले नाही. तर स्थानिक कोल्हारे ग्रामपंचायतीला देखील असे बांधकाम करताना कळविण्यात आले नाही किंवा बांधकाम करताना त्याबद्दल माहिती देण्याची तसदी वैद्यकीय अधिकाºयांना आवश्यक वाटली नाही. मात्र त्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होत असून नेरळ आरोग्य केंद्राला औषधांचा साठा जिल्हा परिषद पाठवते की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो.
रुग्ण कल्याण समितीची परवानगी
रु ग्णालयाच्या रु ग्ण कल्याण समितीने जानेवारी २०१७च्या बैठकीत रु ग्णालयाबाहेर असलेल्या जमिनीवर दुकाने बांधण्यास परवानगी दिली असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी यांचे म्हणणे आहे.
ती दुकाने समृद्धी बचत गट बांधत असून त्या दुकानांच्या मासिक भाड्यातून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र रु ग्णांसाठी सलाईन आणि औषधे घेणार असल्याची माहिती डॉ. गवळी यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेचा आपण सदस्य झाल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात गाळे बांधण्याबाबत कोणताही विषय चर्चेला अथवा विषय पत्रिकेत आला नाही. मला देखील तुम्ही सांगितले म्हणून कळले, परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी चार दिवसांपूर्वी आपल्याकडे आलेले असताना त्यांनी हा विषय कानावर देखील घातला नव्हता.
- अनसूया पादिर, सदस्या, रायगड जिल्हा परिषद
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आरोग्य विभाग कुठेही दुकानांचे गाळे बांधत नाही. त्याप्रमाणे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला अशा प्रकारचे गाळे बांधायला कोणतीही परवानगी दिली नाही. त्यामुळे या विषयाची दखल जिल्हा परिषद घेईल.
- डॉ. एस. ए. देसाई,
जिल्हा आरोग्य अधिकारी
रु ग्ण कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे हे गाळे बांधले जात आहेत. त्यासाठी गाळे बांधून पूर्ण झाल्यानंतर कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याचे भाडे रुग्णालयासाठी वापरले जाणार आहे.
- डॉ. रमेश गवळी,
प्रभारी वैद्यकीय अधिकारी