- विजय मांडे, कर्जतकर्जत-पनवेलदरम्यान लोकल किंवा शटल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांकडून होत आहे. मात्र हा मार्ग लोकल किंवा शटलच्या प्रवासी वाहतुकीसाठी उभारण्यात आला नसल्याचा लेखी खुलासा रेल्वे प्रशासनाने केला आहे.२००७ पासून कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज मांगीलाल ओसवाल हे कर्जत पनवेल प्रवासी वाहतुकीबाबत पाठपुरावा करीत आहेत. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना यासंदर्भात लेखी उत्तर दिले. यात कर्जत-पनवेल हा रेल्वेमार्ग लोकल किंवा शटल सेवेसाठी सुरू करण्यासाठी उभारलाच नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच लक्ष घालावे तसेच लोकप्रतिधींनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करावी, अशी विनंती ओसवाल यांनी रेल्वेकडे केली आहे. पनवेल-दिवा-कल्याण-कर्जत सेक्शन हा मार्ग वाहतुकीमुळे व्यस्त आहे. त्यामुळे पर्याय म्हणून कर्जत -पनवेल हा रेल्वेमार्ग उभारला गेला आहे. हा मार्ग प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.कर्जत-पनवेल रेल्वेमार्गासाठी रेल्वे प्रशासनाने १३७ कोटी २८ लाख खर्च केला आहे. परंतु एवढा खर्च करूनही रेल्वे प्रशासनाला, कर्जत - पनवेल या मार्गावरून अद्याप शटल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. या मार्गावर वार्षिक उत्पन्न खूपच कमी मिळत आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २००९ पर्यत केवळ रु. १२ लाख ३३ हजार एवढेच उत्पन्न रेल्वे प्रशासनाला मिळाले आहे. या मार्गावरून लोकल अथवा शटल सेवा सुरू झाल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होईल, असा विश्वास प्रवासी संघटनांना आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीमुळे धक्का बसला आहे; तरीही आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे. लोकप्रतिधींनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवावा. कर्जत-पनवेल दरम्यान उभारण्यात येणाऱ्या दुहेरी मार्गावर तरी प्रवासी वाहतुकीचा विचार व्हावा. पंकज ओसवाल, सदस्य प्रवासी संघटना
लोकलसाठी मार्गच नाही
By admin | Published: April 10, 2016 1:10 AM