बाणकोट खाडीपुलाची अजूनही प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:54 AM2019-06-11T01:54:43+5:302019-06-11T01:55:07+5:30
तांत्रिक अडचणी असल्याने आठ वर्षांत काम अपूर्णच : रायगड - रत्नागिरी जिल्हे जोडणारा पूल ठरणार विकासाचा दुवा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्याचा विकास या दृष्टिकोनातून अनेक विकसित कामाची बांधणी केली गेली आहे. त्याच विचाराने कोकण किनारपट्टीच्या बागमांडला आणि केळशी दरम्यानच्या बाणकोट खाडीवर वरळी-सी लिंकप्रमाणे बांधण्यात येणाऱ्या पुलाची प्रतीक्षा आणखी किती वर्षे करावी लागणार आहे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाºया महत्त्वपूर्ण पुलाची गेली आठ वर्षे या ना त्या कारणाने कामात चालढकल होत आहे. बाणकोट पुलाचे काम सध्या बंद स्थितीत आहे. सुरुवातीला श्रीवर्धन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणारा हा पूल सध्या ठाणे खाडी विभागाकडे आहे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून पूल बांधण्यात येत आहे. या सागरी सेतूचे भूमिपूजन नोव्हेंबर२०१२ मध्ये झाले. मे २०१६ मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप काम पूर्ण झाले नाही. सर्वात आधी बांधण्यात येणारा बाणकोट खाडीवरील हा सेतूसाठीचा अंदाजित खर्च १८२ कोटी रुपये इतका आहे. सद्यस्थितीत बांधकामाचा कालावधी आणखी वाढल्याने खर्च देखील वाढणार आहे. हा पूल पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.
या सेतूमुळे रायगड व रत्नागिरी जिल्हे सागरी मार्गाने जोडले जातील, शिवाय जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, निर्यात वाढीला चालना मिळणार आहे. कोकण किनारपट्टीलगत सागरी महामार्ग आहे. मात्र, अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार पुलांची उपलब्धता नसल्यामुळे वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून होते. त्याचा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर होतो. वाहतुकीचा बोजा वाढून अपघातांचे प्रमाणही या महामार्गावर वाढले आहे. शिवाय वेळ आणि इंधनाचा अपव्ययही होत आहे. या पुलामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभलेल्या विस्तीर्ण सागरीकिनाºयाला लागून असणाºया महामार्गावर पूल उभारून सागरी महामार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. प्रामुख्याने या पुलाचा वापर रत्नागिरी जिल्हा, बाणकोट खाडीमार्गे पर्यटक व नागरिकांना श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड, अलिबाग या ठिकाणी जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे .
गेल्या आठ वर्षांतल्या घडामोडी
नोव्हेंबर २०१२ मध्ये बाणकोट खाडीपुलाचे भूमिपूजनप्रसंगी सीआरझेड परवानगी नव्हती मात्र, त्यावेळी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरु होती, परवानगी मिळण्यापूर्वीच भूमिपूजन
झाले होते. परवानगी मिळाल्यानंतर बांधकामास सुरुवात झाली. २०१६ मध्ये बाणकोट खाडी पुलाला रॉयल्टीची आडकाठी झाली.
महसूलकडून दंडाची नोटीस, अपील पडून, कोट्यवधीचा प्रकल्प लांबणीवर गेला. बाणकोट पुलाचे काम हे पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन होत असल्याने मे २०१६ पासून आणखी मुदतवाढ मिळाली आहे.
बाणकोट खाडीवरील या सेतूसाठीचा अंदाजित खर्च १८२ कोटी रुपये इतका आहे. मात्र, बांधकामाचा कालावधी आणखी वाढल्याने खर्च देखील अंदाजे २०० कोटीहून अधिक वाढल्याने काम रखडले.
बाणकोट खाडीवरील पुलाचे फायदे
च्रायगड-रत्नागिरी जिल्हे सागरी महामार्गाने जोडले जाणार. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड या तालुक्याच्या परिसरातील बाणकोट, केळशी आदी ठिकाणी मिळणारे बॉक्साइड रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरातून निर्यात करणे शक्य होईल. त्यामुळे परकीय चलनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
च्रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जाणाºया पर्यटकांना मंडणगड, दापोलीमार्गे सर्वात जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवासाचे अंतर ६० किमीने कमी झाल्याने प्रवासाच्या वेळेत आणि इंधनामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल.
पुलाची वैशिष्ट्ये
च्पुलाचे मध्यवर्ती गाळ्यांचे बांधकाम बांद्रा-वरळी सी-लिंक पुलासारखे केबल स्टे या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने पर्यटकांसाठी आकर्षण.
च्पुलाची लांबी
१३७५ मीटर
च्जोडरस्त्यासह पुलाची लांबी १८३७मीटर
च्पुलाची रुंदी
१२.५० मीटर
च्पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांमधून नेव्हिगेशन वाहतुकीची सोय.
च्पूल पाइल फाउंडेशनवर आधारित आहे.