जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कइर्शाळगड : मुसळधार पाऊस कोसळत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास मोठमोठे आवाज झाले. त्याचवेळी काहीतरी वेगळे घडल्याचा अंदाज आला... क्षणात घराचे छप्पर अंगावर कोसळले. लगेचच हालचाल केल्याने मला ढिगाऱ्यातून बाहेर पडता आले... ३५ वर्षांचा रामू राघू चौधरी सांगत होता... दुर्घटनेला १५ तास उलटून गेले तरी त्याची भीषणता त्याच्या बोलण्यात व चेहऱ्यावर जाणवत होती.
रामू चौधरी हा पेजारी येथे रहावयास आहे. इर्शाळवाडी ही त्याची सासूरवाडी. त्यामुळे तो पत्नीसमवेत तिकडे आला होता. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने गुरुवारी परत जाण्याचे त्याने ठरविले होते. मात्र बुधवारी रात्रीच त्यांच्यावर काळ ओढवला. घडलेल्या घटनेची माहिती देताना त्याचे हात-पाय कापत होते. तो म्हणाला, ‘मोठा आवाज आला, त्याचवेळी काही तरी अघटित झाले, याचा अंदाज आला. मात्र जागेवरून उठेपर्यत अंगावर छप्पर आणि दगड पडले. त्यामुळे भीतीने तारांबळ उडाली. मात्र मी हिमतीने हालचाल करीत अंगावरील ढिगाऱ्यातून बाहेर निघालो. पत्नी व घरातल्यांनाही बाहेर काढत पळत सुटलो. त्यामुळे आमचे जीव वाचले. पण इतर बऱ्याच घरांतील लोक झोपले असल्याने त्यांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही. त्यामुळे ते ढिगाऱ्याखाली सापडले. रात्री मदतीसाठी जवान येऊ लागले. तोपर्यत घरातील व्यक्ती, जनावरे, सर्व साहित्य गाडले होते.