रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंपाची होती कुणकुण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 01:49 AM2019-11-24T01:49:13+5:302019-11-24T01:49:53+5:30
राज्यात शनिवारी घडलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींची कुणकुण रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांना लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काहीतरी गडबड करत आहेत.
- आविष्कार देसाई
अलिबाग : राज्यात शनिवारी घडलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींची कुणकुण रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांना लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काहीतरी गडबड करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज झाले आहेत, असे वृत्त जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीच धडकल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यात नवा राजकीय भूकंप होणार, असे गृहीत धरले जात होते. राज्यात भाजपाची सत्ता येणार असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठींबा देत असल्याचे पत्र शनिवारी राज्यपालांना सादर केले. त्यामुळे भाजपाचा राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा शपथविधी सुध्दा तातडीने सकाळी उरकरण्यात आला. अजित पवार यांनी अंधारात ठेऊन हा निर्णय घेतल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.
अजित पवार यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यासोबत असणारे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनिल भुसारे हे शरद पवार यांच्यासोबत आले. त्याचप्रमाणे आमदार सुनिल टिंगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिक कोकाटही आता शरद पवारांच्या बाजूने उभे राहीले आहेत.
राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे भाजपा सत्तेची समीकरण कशी मांडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सत्तेकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांना भाजपा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शिवसेना आमदारांच्या संपर्कात असल्याचे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.
आम्ही शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले ओहोत. त्यामुळे सरकार हे आमचेच येणार असल्याने कोणीही फुटणार नाही, असा विश्वास अलिबागमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
महाडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि कर्जतचे शिवसेनेचे तिसरे आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. राष्ट्रवादीच्या श्रीवर्धनमधील आमदार आदिती तटकरे या अजित पवार यांच्या सोबत जाणार की शरद पवार यांची साथ देणार याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.
एकेकाळी अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रायगडचे खासदार सुनिल तटकरे हे शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवसांत राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.
उरण तालुक्यातील राजकीय पक्षांत कहीं खुशी... कहीं गम...
1जवळपास महिनाभर सुरू असलेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आदी पक्षांची मिळून महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली असतानाच शनिवारी सकाळी भाजप-राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा नाट्यमयरीत्या शपथविधी झाला. या खळबळजनक सत्ता स्थापनेनंतर उरण विधानसभा मतदारसंघात काही राजकीय पक्षात कहीं खुशी, कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सत्ता स्थापनेनंतर उरणमध्ये भाजपने आमदार महेश बादली यांच्या नेतृत्वाखाली शहरातून विजयी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष केला. या जल्लोषात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते.
2महाराष्ट्रात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीतर्फे सत्ता स्थापनेसाठी जय्यत तयारी सुरू होती. उरण मतदारसंघातही त्यादृष्टीने विजयाचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत होते. मात्र, महाविकासआघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी अंतिम काही तास शिल्लक असतानाच वेगवान घडामोडी घडल्या. भाजप-राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा नाट्यमयरीत्या शपथविधी झाल्यानंतर उरण मतदारसंघात भाजपने आमदार महेश बादली यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातून विजयी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष केला. या विजयी जल्लोषात तालुका, शहर अध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागोठण्यात शिवाजी चौकात आतषबाजी
नागोठणे : महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर शनिवारी सकाळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर, नागोठणे शहरासह विभागातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जमून जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. या सोहळ्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे, सरचिटणीस आनंद लाड, मनोज धात्रक, रोहे तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रऊफ कडवेकर, शहर अध्यक्ष सचिन मोदी, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रेया कुंटे, असगर सय्यद, विवेक रावकर, किशोर म्हात्रे, विठोबा माळी, तिरतराव पोलसानी, सुरेश जैन, मनोहर माळी, राजेंद्र लवटे, फातिमा सय्यद, शहनाज कडवेकर, नईमा काजी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मारुती देवरे, प्रकाश मोरे यांची अभिनंदनपर भाषणे झाली.
म्हसळ्यातही शपथविधीनंतर जल्लोष
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचे स्वागत म्हसळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करून केली. या जल्लोषात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, म्हसळा तालुका भाजपचे अध्यक्ष शैलेश पटेल, मंगेश मुंडे, तुकाराम पाटिल, प्रकाश रायकर, सुनिल शिंदे,शरद चव्हाण, सुनिल विचारे, फैसल गीते, शैलेश खापनकर, दिलीप कोबनाक, रामजी टिंगरे, अनिल टिंगरे आदी उपस्थित होते.
मुरुडमध्ये घोषणाबाजी; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
मुरुड : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेताच मुरुड शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या निशाणीचे झेंडे सर्वत्र झळकवून, घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. अचानकपणे झालेल्या या शपथ विधीमुळे संपूर्ण तालुक्यातील चर्चांना उधाण आले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्याकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी १० वाजता शहरात दुचाकी रॅलीची काढून जयघोष करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी मुरुड तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश मानकर, शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, कुणाल जैन, भारतीय जनता पार्टीचे मुरुड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जाहिद फकजी, बाळा भगत उदय सबनीस, अभिजित पानवलकर, संजय भायदे, मंगेश शिरवणकर, अर्शद आदमने, हरीश आर्कशी, यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.