अनिल पवार,लोकमत न्यूज नेटवर्क
नागोठणे : कोकणची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्यावर पावसाळ्यात जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वडखळपासून नागोठणे ते कोलाड या दरम्यान काही ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तर रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.
वडखळ ते कोलाडमध्ये गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव येथून पुढे इंदापूरपर्यंत रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना लहान-मोठ्या वाहनांसह, अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार ते सहा फूट रुंदीचे व सुमारे एक ते दीड फूट खोलीचे हे खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी भरल्याने वाहने खड्ड्यात आदळून कित्येकदा त्यांचा तोल जाऊन अपघात होतो. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांची कसोटी लागते. तीन दिवसांपूर्वीच नागोठणेजवळील वाकण नाका वाहतूक पोलिस चौकीजवळ खड्ड्यांतून वाट काढत असताना लोखंडी कॉइल वाहतूक करणारा ट्रेलर उलटला होता.
नाहीतर ९ ऑगस्टला आंदोलन
वडखळ ते नागोठणे, कोलाड दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. महामार्ग विभागाला वेळोवेळी पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊनही अधिकारी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ३१ जुलैपर्यंत मोठमोठे खड्डे बुजविले नाहीत तर नागोठणेजवळील वाकण नाका येथे ९ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा मराठी पत्रकार परिषदेत दिला आहे.
आधीच काँक्रिटीकरण का नाही?
अतिवृष्टीमुळे डांबरीकरण टिकणार नाही, असे अनेकांनी सांगितले होते. त्याचवेळी काँक्रिटीकरण करण्यावर भर का नाही दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरुवातीलाच काँक्रिटीकरण झाले असते तर कोकणवासीयांना यातना सहन कराव्या लागल्या नसत्या, असे बोलले जात आहे.