म्हसळा : रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहीन असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा आज येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.नवीन इमारतीला माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव देण्याची मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. तातडीने प्रस्ताव पाठवा त्याला लगेचच मंजुरी दिली जाईल अशी ग्वाहीही मुश्रीफ यांनी दिली.
विधानसभेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून १६१ आमदार निवडून आल्याने याही वेळी विराेधी बाकावर बसून काम करावे लागेल असे वाटले हाेते, परंतु राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी राज्याची सूत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली. त्याला काँग्रेसनेही मान्यता दिली. हे सरकार पाच वर्षे टिकेल याची खात्री देताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले असल्याचे आवर्जून सांगितले.जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी कमीत कमी २० नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्याधिकारी डॉ.पाटील यांना सूचित केले. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना उजाळा दिला. हसन मुश्रीफ हे आघाडी सरकारमधील अभ्यासू,वजनदार आणि खास करून पवार यांच्या मर्जीतील मंत्री आहेत.गरिबांना सेवा कशी द्यावी याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात जलजीवन कार्यक्रमांतर्गत ६०० योजनांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव ठेवले असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, अलि कौचाली,महमदभाई मेमन,तालुकाध्यक्ष समीर बनकर,राजीप कृषी सभापती बबन मनवे,महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,प्रांताधिकारी अमित शेटगे आदी उपस्थित होते.
काेराेनामुळे गेले वर्ष विकासाविना वाया गेले आहे. व्यवसाय, व्यवहार पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर वसुली थांबली आणि राज्याचा अर्थसहाय्य खोळंबला. जो निधी गोळा होत होता त्यावर सरकारने आरोग्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च केला आहे. आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे असे मुश्रीफ यांनी सांगितले. नवीन सरकारी इमारतीत सर्वसामान्यांना सेवा मिळायला हवी आम्ही मंजूर केलेल्या नवीन योजनांचा लाभ देता येईल असे काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या. कोरोना कालावधीत लोकांची खरी सेवा सरकार आणि सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर,परिचारिका,वाॅर्ड बॉय,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासारख्या वीरांनी मेहनत घेतल्याचेही त्यांनी अधाेरेखित केले.