आठ वाड्यांचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:34 PM2018-11-24T23:34:00+5:302018-11-24T23:34:18+5:30
जिल्हाधिकाऱ्यांंनी दिले संबंधित अधिकाऱ्यांना आदेश : पाली-भुतिवली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना सुरू
- जयंत धुळप
अलिबाग : अलिबाग : माथेरानच्या डोंगरात असलेल्या सागाची वाडी, आसलवाडी, बोरीची वाडी, भुतिवली वाडी, चिंचवाडी, धनगरवाडा, धामणदांडा, नाचण्या माळ या आठ वाड्यांना तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करा, असे आदेश शनिवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शासकीय यंत्रणांना दिले आहेत.
माथेरान डोंगरात असलेल्या आठ वाड्यांच्या पाणीसमस्येबाबत कविता वसंत निरगुडे या युवतीने जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सुट्टीचा दिवस असूनही शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावली. तत्पूर्वी संबंधित प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांना आठ वाड्यांवर पाठवून तेथील परिस्थितीचा अहवाल मागविला. त्यानंतर बैठक बोलावून पाणीसमस्या सोडवण्यासाठी चर्चा करून आदेश देण्यात आले.
माथेरान परिसरातील आठ वाड्यांचा पाणीप्रश्न बिकट आहे. या वाड्यांना पाली-भुतिवली धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. पाली-भुतिवली धरणाच्या पायथ्याशी उद्भव विहीर घेऊन त्यातून पंपिंग करून धामणदांडा येथे पाण्याची टाकी उभारणे व तेथून गावांना पाणीपुरवठा करणे, अशी एक कोटी ४० लाख रु पयांची योजना प्रस्तावित आहे. या योजनेच्या कामास गती मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती या तातडीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता पी. एस. जोशी यांनी दिली. या संदर्भात स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले.
योजनेत सुमारे पाच कि.मी. पाइपलाइनचा अंतर्भाव आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित व्हायला वेळ लागणार आहे. परिसरात पाली-भुतिवली धरणाजवळ आसल गावाजवळ एका उद्भव विहिरीतून स्थानिक गावकºयांनी लोकसहभागातून पाइपलाइन टाकली आहे. तथापि, ही पाइपलाइन गळकी असल्याने पाणी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पाइप, विद्युत पंप
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी निर्देश दिले की, या ठिकाणी उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तातडीने लोखंडी पाइप व विद्युत पंप उपलब्ध करून देण्यात यावा.
ही योजना कार्यान्वित करण्यात यावी, यामुळे आसल, भुतिवली, बोरीचा माळ, सागाची वाडी, धामणदांडा या गावांचा पाणीप्रश्न सोडविता येईल.
उर्वरित गावात लहान मशिन नेऊन बोअर घेण्यात यावी, किंवा अस्तित्वात असलेल्या विहिरींमध्ये आडवे बोअर घेऊन पाण्याची उपलब्धता तपासण्यात यावी व पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे आदेश सूर्यवंशी यांनी दिले.
आपल्याला कधी गावाला गेले तरी पहाटे उठून पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. या भागात रस्त्याची सुविधा आणि पाण्याची सोय केल्यास या भागातील सर्व आदिवासीवाड्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात.
- मंगेश सुतक, मुख्याध्यापक, नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय