अलिबाग : अरबी समुद्रात श्रीवर्धनच्या दिशेने मंगळवारी रात्री उशिरा संशयित चिनी जहाज रत्नागिरीहून श्रीवर्धनकडे येत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली होती, मात्र ते आढळून आले नाही. तटरक्षक दलाने या प्रश्नी हात झटकले आहेत, त्यामुळे जहाज गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.हे अनोळखी जहाज येणार असल्याचे कळल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या, रायगड पोलिसांनी त्यांच्या हद्दीत तपास केला परंतु ;ते सापडले नाही,अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली.पोलिसांना ठराविक हद्दीपर्यंत जाता येते. त्यानंतर तटरक्षक दलाने शोध सुरू केला, त्यांनी काय कारवाई केली यांची माहिती घ्यावी लागेल असे स्पष्ट केले. एचवाय ५ असे या जहाजाचे नाव असल्याचे सांगण्यात येत असून ते रत्नागिरीच्या दिशेकडून पुढे निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुरुड-जंजिरा तटरक्षक दलाचे कामंडन्ट अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिसांनी माहिती दिली आहे त्यांच्याकडून माहिती घ्या, असे उत्तर देत त्यांनी हात झटकले.जहाज आढळल्याचा संशय आल्याने तटरक्षक दलासह पोलिसांना अतिसावधानतेचा इशारा दिला होता, मात्र रायगड पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता ते सापडले नाही.त्यामुळे समुद्रकिनारे, लॅडिंग, जेट्टी, खाडी किनारी गस्त वाढवण्याचे आदेश रायगड पोलिसांनी दिले आहेत, असे गुंजाळ यांनी सांगितले.
रायगडमधील 'ते' अज्ञात जहाज अचानक झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:30 AM