घरफोडीतील अट्टल चोरटा जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई
By राजेश भोस्तेकर | Published: May 3, 2023 08:47 PM2023-05-03T20:47:48+5:302023-05-03T20:48:28+5:30
अलिबाग, मांडवा परिसरात केलेल्या दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : तांडेल म्हणून मच्छीमार बोटीवर असूनही अति पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी बंद घराची रेकी करून घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले आहे. संदीप निषाद (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी संदीप याने अलिबाग, मांडवा परिसरात केलेल्या दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
अलिबाग व मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे वाढले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घरफोडी गुन्ह्यांचा तपास लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व प्रभारी अधिकारी अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम , सहाय्यक फौजदार दिपक मोरे, पोलीस हवालदार प्रशांत दबडे , अमोल हंबीर, अक्षय जगताप व पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे आदी पथकाने शोध सुरु केला.
आरोपी संदीप निषाद मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील सुलतानपूर येथील रहिवासी आहे. गेली आठ वर्ष आरोपी हा अलिबाग येथे एका बोटीवर तांडेल म्हणून काम करीत होता. मात्र तरीही अती पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी तो गुन्ह्याकडे वळला. पहिल्यांदा एका घरात दागिने चोरल्याचा गुन्हा केला. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक करून शिक्षाही झाली होती. मात्र त्याला चोरी करण्याची सवय लागली आहे. संदीप हा बंद घराची रेकी करून घरफोडी करत होता. संदीप हा चोरी करून लोकवस्ती पासून दूर नवगाव येथील जंगलात राहत होता.
निषाद याचा नवगाव असल्याची बातमी स्थानिक गुन्हे पथकातील हवालदार अमोल हंबीर व पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. बुधवारी ३ मे रोजी पहाटे नवगांव भागात जंगलात शोधा शोध सुरू केली. परंतू त्याला चुणूक लागल्यावर पळ काढला. दोन तीन तास चोर पोलीस खेळ सुरू होता. अखेर निषादला पकडण्यात पथकाला यश आले. त्याला अटक करून बुधवारी दुपारी अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मांडवा व अलिबाग हद्दीतील दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"