निखिल म्हात्रे
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील क्राइम रेट कमी झाला असून, पोलिसांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. दामिनी पथक, गस्ती पथके, तसेच जनजागृती यामुळे गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या असून पेट्रोलिंग आणखी वाढवले जाणार आहे.
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत खून, घरफोड्या, बलात्कार, अपहरणाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील चार महिन्यात २५ चोऱ्या झाल्या आहेत.निसर्गाचे वरदान लाभलेला रायगड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी होऊ लागला. पुन्हा वर्दळ सुरू झाली, त्याचा फायदा गुन्हेगारांनीही घेतला पण संपूर्ण वर्षभराचा आलेख लक्षात घेता एकंदरच गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. रायगड पोलीस दलाच्या हद्दीत २०१९ मध्ये २ हजार ४५७ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये ४८९ चोरीच्या, २१ खून तर ४९ बलात्कार घटना घडल्या होत्या. या तुलनेत २०२० मध्ये १ हजार २८० गुन्हे नोंदवले गेलेत. जिल्ह्यात वर्षभरात २१ खून, ५८ बलात्कार, ६ दरोडे, ३८८ चोऱ्यांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही दिवस निर्बंध वाढविण्याचा निर्णयामुळे सलग महिनाभर दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी बाजार मात्र ठप्प आहे. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक घटली आहे.कोरोनाच्या धास्तीने चोर देखील जीव मुठीत धरून बसले असले तरी काही प्रमाणात चोऱ्या मात्र होतच आहेत. मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच आहे. पोलीस यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार चोरटे करू शकतात. त्यामुळे पोलिसांना हे दुहेरी आव्हान देखील पेलावे लागणार आहे.
खुनाच्या घटना कमी झाल्या २०२० मध्ये १ हजार २८० गुन्हे नोंदवले गेले होते. जिल्ह्यात वर्षभरात २१ खून, ५८ बलात्कार, ६ दरोडे, ३८८ चोऱ्यांची नोंद झाली आहे. पोलीस विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आल्याने खुनाच्या घटना कमी झाल्या आहेत.
बलात्कारही कमी झाले कोरोना संसर्ग आणि लाॅकडाऊनमध्ये बलात्काराच्या घटना देखील कमी आहेत. गेल्या चार महिन्यांत बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली नाही. शिवाय मुली पळविण्याच्या घटनाही कमी झाल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण घटले आहे. आतापर्यंत महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा शंभर टक्के छडा लावला असून, आरोपींना अटकही केली आहे. गुन्हेगारी वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे. यासाठी रात्रीची गस्त वाढविणे, घडलेल्या गुन्ह्यांचा त्वरित तपास लावण्यावर भर आहे.- अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधीक्षक