खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळल्याची घटना २० जुलै रोजी घडली. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण अजूनही बेपत्ता असल्यचं सांगण्यात येतंय. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरु आहे. NDRF ची टीम अजूनही ढिगाऱ्याखालील मृतदेह काढण्यात व्यस्त आहे. मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. या गावाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. गावात जाण्यासाठी रस्ता नाही, वीज देखील नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात गावाला दिवस काढावे लागत होते. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेत टाकले जात होते.
पावसाच्याआधी इर्शाळवाडी गाव खाली असलेल्या नम्राचीवाडी या गावात स्थलांतरित झाले होते. मात्र तिथे वनविभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ती घरे तोडण्यात आली. एकदा नव्हे, तर दोनदा-तीनदा वन विभागाचे आदिवाशींनी बांदलेल्या झोपड्या तोडल्या. त्यामुळे हे गावकरी पुन्हा इर्शाळवाडीमध्ये राहण्यासाठी आले आणि ही घटना घडली. पावसाळा संपेपर्यंत वन जमिनीवर या रहिवाश्यांना राहू दिले अशते, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे.
औषध फवारणी
इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.
अशी असेल व्यवस्था
मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.
अधिकारी सतर्क असल्याने, यंत्रणा वेळेवर घटनास्थळी
हवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार, बुधवार दोन दिवस रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर अधिकारी सतर्क असावेत, यासाठी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांनी जागे राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी जागे राहावेत म्हणून रात्री अकरा आणि एक वाजता व्हीसी ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सतर्क होते. इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर खालापूर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.