मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:34 PM2020-01-17T22:34:47+5:302020-01-17T23:01:01+5:30

दोन वर्षांपासून टंचाईची समस्या

Thirsty Closed borewell, well drained for water | मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण

मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण

Next

गणेश प्रभाळे

दिघी : रोजगारनिर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगिकीकरणाची भर पडत आहे. पर्यटनाने गजबजलेले सुविधापूर्ण शहर अशी म्हसळा तालुक्याची ओळख आहे. मात्र, पुणे-दिघी महामार्गालगत असणाऱ्या या तालुक्यातील मेंदडी आदिवासीवाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली तरी विकासापासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.

दिघी-पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधांयुक्त शहरांची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासीवाडीवर साधारण ८० कुटुंबांतील ३४० लोक राहतात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासीवाडीवर अद्यापही पाणी आले नाही. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेवून विविध विकासकामे करण्यात आली. आजही येथील जनतेला ते वरदान ठरत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. मात्र, या आदिवासीवाडी शेजारी एक धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवाना मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यावाचून तहानलेले आहेत.

येथील सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी असून स्वदेश फाउंडेशनमार्फत बांधण्यात आलेली बोअरवेल बंद अवस्थेत आहे. दुसरी कोणतीच नळयोजना नसल्याने सध्या या गावात पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थ रानातील झºयातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक आहे. राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा कारणांमुळे मेंदडी आदिवासीवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. यामुळे आदिवासीवाडीत पाणीटंचाईची समस्या कायम आहे.

गेल्या दीड वर्षापासून गावात पिण्यासाठी पाणी नाही. पाणीसमस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, मेंदडी ग्रामपंचायतीकडून पाण्यासंबंधी ठराव घेऊन वरिष्ठांना सतत पत्र व्यवहार करून वाडीवर पाण्यासंबंधी मागणी केली होती. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही. - जान्या धर्मा वाघमारे, माजी अध्यक्ष, आदिवासी समाज, मेंदडी

मेंदडी आदिवासीवाडीवरील पाण्याची समस्या असल्याने ग्रामस्थांनी केलेल्या बोअरवेल दुरुस्तीच्या मागणीनुसार वरिष्ठांना तत्काळ कळवण्यात आले आहे. यातून प्रशासनाने पाणीसमस्या कायमची मिटवण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करत आहोत. - राजश्री कांबळे, सरपंच, मेंदडी

Web Title: Thirsty Closed borewell, well drained for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.