वैभव गायकर -पनवेल: राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पनवेल पालिका क्षेत्रात अद्यापही नागरिकांमध्ये कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. रात्रीची संचारबंदी लागू असतानाही पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी उशिरापर्यंत दुकाने सुरू असतात.अनेक भागातील दुकान, आइस्क्रीम पार्लर, ऑर्केस्ट्रा बार, महामार्गावरील खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने उशिरापर्यंत सुरू असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पनवेल पालिका हद्दीतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असून मागील पाच दिवसात ७०० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पाडल्याने वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याकरिता रात्री ११ ते सकाळी ५ वाजेदरम्यान संचारबंदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे. साथ रोगप्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत पालिका आयुक्तांनी जाहीर केलेल्या संचार बंदीदरम्यान रात्रीचा संचार करणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे. विनामास्क फिरणारे नागरिक अद्यापही रस्त्यावर फिरत आहेत. पनवेल एसटी आगार, रेल्वेस्थानक तसेच दुकाने, मॉल्स येथे अनियंत्रित गर्दी होत आहे.
पोलीस कारवाई काही प्रमाणात थंडावली आहे. परिमंडळ दोनमध्ये मोजक्याच ठिकाणी वाहनांची तपासणी होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कार्यक्रम पार पडत आहेत का? याबाबत योग्य ती तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने पालिका क्षेत्रात कोविडचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.