तीस वर्षांनंतरही कामगार योजनांपासून वंचित
By admin | Published: September 27, 2016 03:30 AM2016-09-27T03:30:56+5:302016-09-27T03:30:56+5:30
महाड औद्योगिक वसाहतीची स्थापना होवून तीस वर्षे लोटली मात्र अद्यापही कामगार कल्याण मंडळाचे अस्तित्व परिसरात दिसून येत नसल्याने हजारो कामगार विविध कल्याणकारी
- संदीप जाधव, महाड
महाड औद्योगिक वसाहतीची स्थापना होवून तीस वर्षे लोटली मात्र अद्यापही कामगार कल्याण मंडळाचे अस्तित्व परिसरात दिसून येत नसल्याने हजारो कामगार विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. महाड उत्पादक संघटनेमार्फत यासाठी वारंवार प्रयत्न केले जात असूनही त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.
दरवर्षी कामगारांच्या पगारातून कपात केलेली ठरावीक रक्कम कामगार कल्याण निधीमध्ये जमा केली जाते. आजपर्यंत कोट्यवधीचा निधी महाड परिसरातून जमा करणाऱ्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलेही सोयरसुतक नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व करणारे कामगार नेते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये त्यांचा कामगार कल्याण निधी दरवर्षी कपात केला जातो. सर्व आस्थापना, कारखाने, बँका, पतसंस्था, हॉटेल्स, खाजगी कंपन्या, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, महामंडळाचे कर्मचारी व कामगारांना या कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध शैक्षणिक योजना सुरू आहेत.त्याचा लाभ कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी दिला जात असतो. १० वी ते १२ वी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवणाऱ्या कामगारांच्या मुलांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. १३ ते १५ वी परीक्षेत ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ३ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच डिप्लोमा, डिग्री परीक्षेत ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांला या योजनेतून पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येते. तसेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच्या टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्याला पाच ते आठ हजार रु. अनुदान देण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती म्हणून १५ हजार रुपये राष्ट्रीय पातळीवर क्रीडा शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांसाठी विविध वैद्यकीय सहाय्यता योजना देखील आहेत. मात्र महाड परिसरात अद्यापही महाराष्ट्र कल्याण मंडळच अस्तित्वात नसल्याने महाड परिसरातील हजारो कामगारांना या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
बैठकीत प्रश्नांचा भडिमार
मागील आठवड्यात चिपळूण येथील कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी महाड औद्योगिक क्षेत्रात कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आले होते. मात्र कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता.
हक्क मिळालाच पाहिजे
कामगारांना कल्याणकारी हक्क मिळालाच पाहिजे. महाड औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय सुरू केल्यास त्याचा लाभ कामगारांना मिळेल. मंडळाच्या कार्यालयासाठी जागा देण्यास तयार आहे.
-के. व्ही. आपटे, संचालक,
आपटे आॅरगॅनिक्स, महाड एमआयडीसी