अलिबाग-चोंढी रस्त्यावर बैलांची ही अनोखी सफर
By निखिल म्हात्रे | Published: November 14, 2023 05:29 PM2023-11-14T17:29:38+5:302023-11-14T17:30:31+5:30
बलिप्रतिपदेचे औचित्य साधून चोंढी येथे काढण्यात आलेली बैलगाडींची अनोखी सफर पाहण्यासाठी इतर गावातूनही लोक मोठ्या संख्य़ेने चोंढी नाक्यावर आले होते.
अलिबाग : बैलांच्या मानेवर चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदा जोखड ठेवून यांना फिरण्याासाठी बाहेर काढले जाते. बैलांची ही अनोखी सफर नुकतीच अलिबाग-चोंढी रस्त्यावर पहायला मिळाली. रेवस-अलिबाग या मार्गावरुन मुंबईहून येणाऱ्या शेकडो पर्यटकांचे लक्ष या बैलगाडी उत्सवाने वेधून घेतले. आगामी महिन्यात हिवाळी पिकांसाठी होणारी शेत जमिनीची मशागत आणि नागेश्वर, कनकेश्वर आणि वरसोली येथील यात्रा यामुळेही हा बैलगाडी उत्सव महत्वाचा आहे.
दिवाळी जरी वसुबारसेपासून सुरू होत असली तरी नरकचतुर्दशीला अभंगस्नानाने दिवाळीची सुरूवात होते. यानंतर भाऊबिजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे विशिष्ट असे महत्व आहे. बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी-पाडवा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजा अर्थात शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही या दिवसाचे वेगळे महत्व आहे. अलिबाग तालुक्यात अलिबाग ते चोंढी आणि आवास ते चोंढी या मार्गावर मंगळवारी सकाळपासून शंभरहून अधिक बैलगाड्यांची सफर पहायला मिळाली. या बैलगाड्या चोंढी नाक्यावर येऊन थोड्या वेळाने पुन्हा आपापल्या गावी निघून जातात.
बैलांना या दिवशी सजविले जाते. यांचे पूजनही केले जाते. ही आमची पिढ्यांपिढ्यांची परंपरा आहे. चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदाच बैलाच्या मानेवर जोखड दिले जाते आणि यानंतर शेतकरी हे बैल वर्षभर विविध कामांसाठी वापरत असतो, असे आवास येथील विराज भगत यांनी सांगितले.
बैलांना आम्ही वर्षभर जिवापाड जपतो. यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो. एकीकडे याचा शेतीसाठी उपयोग होत असला तरी हौस म्हणून शर्यतीसाठीही याचा उपयोग होतो, असे एका शेतकऱ्याने सांगितले. शेतीची कामे आटोपल्यानंतर एक विरंगुळा म्हणून बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते. ही देखील फार जुनी परंपरा आहे. ही परंपरा बंद झाल्याने शर्यत प्रेमींमध्ये नाराजी आहे. याचा कुठेतरी सकारात्मक विचार व्हावा अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
बलिप्रतिपदेचे औचित्य साधून चोंढी येथे काढण्यात आलेली बैलगाडींची अनोखी सफर पाहण्यासाठी इतर गावातूनही लोक मोठ्या संख्य़ेने चोंढी नाक्यावर आले होते. रेवस-अलिबाग या मार्गावरुन मुंबईहून येणाऱ्या शेकडो पर्यटकांचे लक्ष या बैलगाडी उत्सवाने वेधून घेतले. यामुळे ही अनोखी परंपरा पर्यटन विकासाच्या दृष्टीने अतिशर महत्वाचे ठरु शकते.