रायगडमध्ये यंदाही भाजपचे स्वप्न अधुरेच, १९८९ मध्ये कुलाबा मतदारसंघातून एकदाच लढवली होती निवडणूक
By राजेश भोस्तेकर | Published: April 3, 2024 12:58 PM2024-04-03T12:58:06+5:302024-04-03T12:58:39+5:30
- राजेश भोस्तेकर अलिबाग : लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये भाजप रिंगणात उतरेल, असे दिसत होते. त्यांनी तशी तयारीही केली होती. ...
- राजेश भोस्तेकर
अलिबाग : लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये भाजप रिंगणात उतरेल, असे दिसत होते. त्यांनी तशी तयारीही केली होती. मात्र, मित्रपक्षांच्या वाटाघाटीत त्यांना विद्यमान खासदार म्हणून ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडावी लागली. त्यामुळे रायगडमध्ये कमळ फुलविण्याचे भाजपचे स्वप्न महायुतीमुळे भंग पावले आहे. आताचा रायगड मतदारसंघ हा पूर्वी कुलाबा मतदारसंघ असताना फक्त एकदा १९८९ मध्ये भाजपने नरेश जाधव यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ६१ हजार ३८३ मते मिळाली होती.
कुलाबा लोकसभा लोकसभा मतदार संघ हा १९६२ ते २००८ पर्यंत अस्तित्वात होता. पनवेल ते पोलादपूर असा १५ तालुक्यांचा हा मतदारसंघ होता. २००८ साली कुलाबा हे नाव बदलून रायगड लोकसभा मतदार संघ निर्माण झाला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघ जोडण्यात आले; तर पनवेल, उरण, कर्जत खालापूर हे विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभेला जोडण्यात आले. १९६२ ते २०१९ पर्यंत १७ लोकसभा निवडणुका झाल्या असून, २०२४ मध्ये ही १८वी लोकसभा होत आहे.
कुलाबा लोकसभा मतदारसंघ असताना १९८९ मध्ये पहिल्यांदा भाजपने नरेश जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. भाजपविरोधात काँग्रेसचे बॅरिस्टर ए. आर. अंतुले, शेकापचे दि. बा. पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यात काँग्रेसचे ए. आर अंतुले याना ३ लाख ३३ हजार ९५०, शेकापचे दि. बा. पाटील यांना २ लाख १८ हजार ५१६; तर भाजपचे नरेश जाधव यांना ६१ हजार ३८३ मते पडली होती. अंतुले हे विजयी झाले होते.
महायुतीमुळे समीकरणे बदलली आणि...
१९९० मध्ये शिवसेना-भाजप युती झाली. त्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेला. २०१९ मध्ये राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप रायगडची जागा लढवेल अशी शक्यता होती. त्यानुसार भाजपने मतदारसंघात मोर्चेबांधणीही केली होती. मात्र भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अशी महायुती झाली. त्यात विद्यमान खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जागा सुटली.