अलिबाग : गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. मात्र, यंदाही गणेशभक्तांचा मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर आणि खड्डेमुक्त होण्याचे स्वप्नच राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याचा केलेला दावा फोल ठरण्याची शक्यता आहे. अद्यापही पहिल्या टप्प्यातील १७ किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे.
दरम्यान, मंगळवारी चव्हाण यांनी महामार्गावर पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. महामार्गाचा पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा पूर्ण करताना शासनाच्या नाकीनऊ आले आहेत. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करण्याबाबत युद्धपातळीवर काम सुरू आहे. यासाठी सिमेंट बेस ट्रीटमेंट आणि व्हाइट टॉपिंग यंत्रणा राबविण्यात आली होती. पळस्पे ते इंदापूर हा ८४ किमीचा काँक्रीट रस्ता केला जात आहे. यासाठी इंदूर येथून अद्ययावत मशिनरी आणली आहे. मात्र, महामार्गाची एक मार्गिका पूर्ण झाली नाही.
कासू ते इंदापूर स्थिती एकूण ४२ किमीचा रस्ता ४२ किमीपैकी २८.२१४ किमी रस्त्याचे काम पूर्ण अजूनही १४ किमी रस्ता अपूर्णावस्थेत ८ किमी रस्ता व्हाइट टॉपिंगद्वारे होणार प्रत्यक्षात साडेचार किमी रस्त्याचे व्हाइट मटॉपिंग पूर्ण साडेतीन किलोमीटरचे काम अपूर्ण २२ किमी रस्ता सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे १२.३२९ किमी रस्ता पूर्ण ९.६७१ किमी रस्ता अपूर्ण १२.३ किमी एक्झिस्टिंग रस्ता असून, ११.२९५ किमी पूर्ण
पळस्पे ते कासू काम पूर्ण पळस्पे ते कासू या ४२.३०० किमी रस्त्याचे काँक्रिट काम पूर्ण करायचे होते. यापैकी ३९.३१ किमीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. जे.एम. म्हात्रे कंपनीतर्फे काम केले जात आहे. २.९९ किमी रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. दोन ठिकाणी मोठे, तर दोन ठिकाणी लहान पेव्हर रस्त्यावर लावले आहेत. तर डायव्हर्जन ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
मुंबईकडे येणारी मार्गिकाही खड्ड्यांतमुंबई-गोवा महामार्गावरील कोकणात जाणारी मार्गिका पूर्ण करण्याच्या नादात मुंबईकडे येणारी मार्गिका ही आजही खड्डेमय आहे. त्यामुळे गणेशभक्तांना येताना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार यात शंकाच नाही.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम समाधानकारक झाले आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल. कशेडी बोगद्यातून एसटी आणि खासगी बसना वाहतुकीस परवानगी देण्याबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. बोगद्याची एक मार्गिका सुरू झाली असली तरी सध्या केवळ छोटी वाहने या बोगद्यातून धावणार आहेत. कशेडी घाटात वाहतूककोंडी होत असते, हे लक्षात घेऊन यासंदर्भात अधिकारी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपास करतील. येणाऱ्या तीन-चार दिवसांत बसचा बोगद्यातून वाहतुकीचा निर्णय घेतला जाईल. - रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री