लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्हा हा मुंबई विभागात यंदाही उच्च माध्यमिक बारावीच्या परीक्षेत अव्वल ठरला आहे. रायगड विभागाचा निकाल हा ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षी पेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही रायगडात मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवेळी पेक्षा यंदा मुलांचा ५ तर मुलीचा ३.४२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे. जिल्ह्यात म्हसळा तालुका हा निकालात अव्वल ठरला आहे.
रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यात पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्याची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थीनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत मुलींची आणि मुलांची निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
विज्ञान ९८.७४ टक्के निकाल
विज्ञान शाखेचे जिल्ह्यात ६ हजार ५०३ मुले, ६ हजार ६७१ मुली असे एकूण १३ हजार १२० विद्यार्थी यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी ६ हजार ४९० मुले, ६ हजार ६०६ मुली असे एकूण १३ हजार ९६ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. ६ हजार ३८० मुले, ६ हजार ५५२ असे एकूण १२ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९८.७४ टक्के निकाल लागला आहे.
कला शाखेचा ८५.७२ टक्के निकाल
कला शाखेचे जिल्ह्यात २ हजार ९६० मुले, २ हजार ६७८ मुली असे ५ हजार ६३८ विद्यार्थ्याची नोंद झाली होती. यापैकी २ हजार ९२० मुले, २ हजार ६५१ मुली असे एकूण ५ हजार ५७१ जण परीक्षेला बसले होते. २ हजार ३४८ मुले, २ हजार ४२८ मुली असे एकूण ४ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण कला शाखेचे ८५.७२ टक्के निकाल लागला आहे.
वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल
वाणिज्य शाखेत जिल्ह्यातील ५ हजार १२२ मुले, ५ हजार ६४ मुली असे एकूण १० हजार १८६ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यापैकी ५ हजार १०६ मुले, ५ हजार ५७ मुली असे १० हजार १६३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. ४ हजार ७६६ मुले, ४ हजार ९१२ मुली असे एकूण ९ हजार ६७८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून एकूण ९५. २२ टक्के वाणिज्य शाखेचा निकाल लागला आहे.
किमान कौशल्य शाखेचा ८७.११ टक्के निकाल
जिल्ह्यात किमान कौशल्य शाखेचे ३१६ मुले, १७३ मुली असे एकूण ४८९ विद्यार्थी परीक्षेसाठी नोंद केली होती. ३०९ मुले, १७२ मुली अशा एकूण ४८१ विद्यार्थ्यानी किमान कौशल्य ची परीक्षा दिली होती. यापैकी २५८ मुले, १६१ मुली असे ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८७.११ टक्के किमान कौशल्यचा निकाल लागला आहे.
तालुका निहाय टक्केवारी
पनवेल ९७.८२ %, उरण ९३.२२ %, कर्जत ९४.२० टक्के, खालापूर ९०.०३ %, सुधागड ८४.३८%, पेण ९०.९४%, अलिबाग ९३.३२%, मुरुड ९०.५२%, रोहा ९५.२२%, माणगाव ९८.२५%, तळा ९७.८६%, श्रीवर्धन ९५.९८%, म्हसळा ९८.६८%, महाड ९२.०३%, पोलादपूर ९०.३९%.