अलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये घुसून १३०० शेतकरी कुटुंबांच्या नव्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गुरुवारी समोर आलेल्या आपत्तीपूर्वी गेल्या मे २०१७ मध्ये देखील सलगच्या उधाणाने जुई अब्बास गावच्या किनाºयावरील समुद्र भरती संरक्षक बंधारा (बाहेरकाठा)फु टून त्या वेळी १८०० एकर भातशेती जमिनीत खारे पाणी घुसून ९५० शेतकºयांना फटका बसला होता. त्या वेळी शासनाकडून नुकसानीचे पंचनामेच करण्यात आले नसल्याने शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्याची संधीच राहिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.या नुकसानीबाबत शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता २३ मे २०१७ रोजी पेण उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांनी उपोषण आंदोलन केल्याची माहिती खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे यांनी दिली. या उपोषण आंदोलनावर तोडगा काढण्याकरिता पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकरी, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मे २०१७ मधील या उधाणाच्या वेळी रायगड जिल्ह्यात ७/१२ उताºयांचे आॅनलाइन संगणकीयकरणाचे काम सुरू असल्याने त्या वेळी नुकसानीचे पंचनामे करता येणार नाहीत. खारे पाणी शेतीत घुसून नापीक झालेल्या जमिनींची स्थळपाहणी आणि पंचनामे करण्याचे काम ३१ जुलै २०१७ नंतर करण्याचे तसेच जुई अब्बास येथे फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीने करुन देण्याचे लेखी आदेश २४ मे २०१७ रोजीच्या पत्रान्वये दिले. परंतु ३१ जुलै २०१७ नंतर आजतागायत नुकसानी पंचनामे झाले नाहीत आणि फुटलेल्या जुई अब्बास संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती देखील झाली नसल्याचे तुरे व अन्य शेतकºयांनी सांगितले.जेएसडब्ल्यू बंदर हे या गावांच्या किनारी भागात नाही तर ते खालच्या बाजूला आहे. संरक्षक बंधारा फुटून शेतामध्ये पाणी घुसण्याच्या या प्रकारास जेएसडब्ल्यू कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तरी सुद्धा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तसेच खारलॅन्ड विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने, ६० लाख रुपये खर्च करुन फुटलेल्या बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करुन देण्याची तयारी कंपनीने दाखविली होती. परंतु खारमाचेला येथील ग्रामस्थांनी हे काम करु दिले नाही, अशी परिस्थिती असल्याची माहिती जेएसडब्ल्यू कंपनीचे उप महाव्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली.यापूर्वी २ कोटी ५० लाख रुपये खर्च करुन कंपनीने वावे, वडखळ, मसद या गावचे समुद्र संरक्षक बंधारे बांधून दिले आहेत. ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास कंपनी फुटलेले बंधारे बांधून देण्यास आजही तयार असल्याचे शिर्के यांनी सांगितले.
‘त्या’ शेतक-यांना नुकसानभरपाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:11 AM