‘ते’ पाच आरोपी देणार आज जबाब; नितीन देसाई आत्महत्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:23 AM2023-08-08T09:23:13+5:302023-08-08T09:23:26+5:30
एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाऊंटंट यांच्याकडूनही सदर कर्ज प्रकरणाबाबत तपास अधिकारी माहिती घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, संबंधित आरोपी मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत खालापूर पोलिस ठाणे येथे वकिलांसोबत माहिती घेऊन उपस्थित राहणार आहेत. त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.
एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाऊंटंट यांच्याकडूनही सदर कर्ज प्रकरणाबाबत तपास अधिकारी माहिती घेत आहेत. तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. नितीन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा खालापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
त्यांना ८ ऑगस्टपर्यंत खालापूर पोलिस ठाण्यात समक्ष हजर राहून जबाब देण्याबाबत खालापूर पोलिसांनी नोटीस दिली होती. जबाब सादर करण्याबाबत नोटीसद्वारे समज देण्यात आलेली होती.
कंपनीतर्फे नितीन देसाई यांना त्रास दिला नसल्याचा खुलासा आराेपींनी केला आहे.
मात्र, मंगळवारी ते पाचही जण खालापूर पोलिस ठाण्यात उपस्थित राहून त्यांची बाजू पोलिसांकडे मांडणार आहेत.