‘ओखी’ वादळाच्या तडाख्याने केरळ आणि तामिळनाडूमधील १११ बोटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाºयावर आढळल्या आहेत. ‘ओखी’ वादळाचा तडाखा बसण्याआधीच रायगड जिल्ह्यातील २५० पैकी २४२ बोटी या माघारी परतल्या आहेत, तर उर्वरित आठ बोटींशी संपर्क न झाल्याने त्या समुद्रामध्येच अडकल्या आहेत. उंच लाटांमुळे उरण तालुक्यातील पाच बोटींमध्ये पाणी भरून त्या बुडाल्या होत्या. मात्र, त्यामध्ये कोणतीच जीवित हानी झालेली नाही.अलिबाग : केरळ, तामिळनाडूनंतर ‘ओखी’ वादळाने आपला मोर्चा महाराष्ट्र राज्याकडे वळवला आहे. या वादळाचा फटका कोकणसह मुंबईला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारी घेतली आहे.सोमवार आणि मंगळवार अशा सलग दोन दिवस वादळाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये काही अंशी तापमान वाढल्याचे जाणवत होते. समुद्राला आलेल्या भरतीच्या कालावधीमध्ये लाटा जोराने उसळत होत्या. मंगळवारी देखील वादळाचे सावट कायम राहणार असल्याने पुढील २४ तास फारच महत्त्वाचे ठरणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.रायगड जिल्ह्यातील २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. त्यातील १९९ बोटी रविवारी, तर सोमवारपर्यंत ४३ अशा एकूण २४२ बोटी परतल्या आहेत. अद्यापही आठ बोटींशी संपर्क न झाल्याने त्या परतलेल्या नाहीत. आठपैकी चार बोटी या दिघी, तर उर्वरित चार बोटी या उत्तर रायगडमधील आहेत. समुद्रामध्ये खूप अंतरावर त्या मासेमारीसाठी गेल्याने त्या कव्हरेज क्षेत्रात उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून समुद्र शांत आहे. प्रवासी बोटी, मासेमारी बोटी, वॉटर स्पोर्ट्स बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. किनारी भागात सागरी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
‘त्या’ बोटी परतल्या, रायगड जिल्ह्यातील २४२ बोटी परतल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:28 AM