लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई/अलिबाग : ठाण्याला स्वतःची मालकी समजणाऱ्यांची मस्ती उतरवायला आलो आहे आणि ती उतरविणारच, असा निर्धार उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐरोली येथील सभेत व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचारसभा रविवारी झाली. यावेळी तमाम शिवसैनिक हे माझे निवडणूक रोखे असून, यंदा हे सगळे वटविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ४०० पार सभा घेतल्या तरी ते जिंकू शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. देशाची सीमा असुरक्षित असून, जवानांवर सतत हल्ले होत आहेत. तुमच्या नादानपणामुळे त्यांचे जीव जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभर आपण सभा घेत असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही गर्दी भाजपच्या पराभवाचा जल्लोष करण्यासाठी जमत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवर खंत व्यक्त करत मोदी परत सत्तेत आल्यावर पाकिस्तानमध्ये जल्लोष होईल, असा त्याचा अर्थ घ्यायचा का, असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाला मोदींनी घरची धुणीभांडी करायला ठेवल्याने अशा आयुक्तांना आपण धोंड्या नाव ठेवल्याची टीका त्यांनी केली.
‘भाजपच्या चक्रीवादळाला रायगडकर रोखतील’ रायगड वासीयांमध्ये चक्रीवादळे परतावून लावण्याची ताकद आहे. आताही ते भाजपरूपी चक्रीवादळाचा मुकाबला यशस्वीपणे करतील, असा आपल्याला ठाम विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. इंडिया आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबाग येथे जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. शिवसेना-भाजपसोबत असताना मोदींना राज्यात सभा घेण्याची वेळ आली नव्हती. मात्र, आता गल्लोगल्ली सभा घ्यावी लागत असल्याचे सांगत देशाला डाग लावणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.