रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्यास पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:34 AM2019-04-02T03:34:39+5:302019-04-02T03:35:03+5:30
तरुणांच्या मनात आहे तरी काय? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग
रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची गरज
पनवेल परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. पनवेल टर्मिनस, मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग रुंदीकरण, विमानतळ आदी प्रकल्प याठिकाणी सुरू आहेत. थेट केंद्राशी निगडित असलेले प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. चांगला लोकप्रतिनिधी मतदानाच्या माध्यमातून लोकसभेत पाठविण्यासाठी निवडणूक ही एक शिडी आहे. तरु णांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन चांगला प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे .
- रूपेश पाटील, सुकापूर
स्टंटबाजीला भुलता
कामा नये
निवडणुका आल्या की सर्वच पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात. यामध्ये प्रामुख्याने झोपडीत जेवण, तरु णांशी चौकात संवाद, रेल्वेत प्रवाशांशी संवाद या गोष्टी सहज नजरेत पडतात. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच या गोष्टी का? पाच वर्षभराच्या कार्यकाळात का नाही? तरु णांनी स्टंटबाजीला न भुलता एक जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावून एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे.
- सचिन पाटील, खारघर
आश्वासनांची पूर्तता आवश्यक
निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांची खैरात उमेदवार करत असतात. प्रत्येक निवडणुकीत अशी खैरात वाटली जाते. आजच्या काळात सुशिक्षित मतदारांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे तरु ण मतदारांनी सर्व गोष्टींचे आकलन करूनच योग्य उमेदवार निवडला पाहिजे. यापूर्वी दिलेल्या उमेदवारांनी किती आश्वासने पाळली आहेत याबाबत देखील माहिती घेऊन मतदान करणे गरजेचे आहे.
- विशाल सिनारे, पनवेल
मतदानाची संधी सोडू नका
नवीन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. अनेक जण यादिवशी सुटी असल्याचे सहलीचा बेत आखत असतात. मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि जबाबदार नागरिक म्हणून ते पार पाडलेच पाहिजे. भारतातील लोकसभेची निवडणूक जगातील मोठी निवडणूक प्रक्रि या असून आपण त्याचा एक भाग आहोत. याचा प्रत्येक मतदारास अभिमान असायला हवा.
- रोशन ठाकूर, खारघर