‘त्या’ मृत्यूचे गूढ उकलले, २६ दिवसांपूर्वी सापडला होता मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:51 AM2017-11-16T01:51:35+5:302017-11-16T01:51:47+5:30
रसायनी पोलिसांना २६ दिवसांपूर्वी वावेघर हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु रसायनी पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्राने त्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : रसायनी पोलिसांना २६ दिवसांपूर्वी वावेघर हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु रसायनी पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्राने त्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलले आहे. मृतदेहाच्या मुखातील चांदीचा दात आणि सदºयाची गुंडी यांचा आधार घेत एपीआय दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धनंजय तेलगोटे यांनी तरूणाच्या मारेकºयांचा तपास केला. यात मृत व्यक्तीचे मित्र आणि त्यांच्या आप्त नातेवाइकांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
रसायनी पोलीस ठाण्याचे पीएसआय धनंजय तेलगोटे यांनी तपास केला असता अनैतिक संबंधातून गोपाळ सितू पवार (२९, मूळ राहणार गुलबर्गा, कर्नाटक) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले असून आरोपी हे गोपाळ याचे मित्र असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वावेघर गेट क्र मांक १ जवळ १८ आॅक्टोबर रोजी झुडपात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. यावेळी मृतदेहाची ओळख न पटल्याने व कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी बेवारस म्हणून नोंद केली होती. यावेळी या मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शिवाय गोपाळ पवार यांच्या नातेवाइकांनी बरेच दिवस गोपाळशी संपर्क होत नसल्याने शोधाशोध सुरु केली होती. यावेळी पीएसआय धनंजय तेलगोटे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत गोपाळच्या नातेवाइकांचा तपास घेऊन त्यांना गोपाळच्या काही वस्तू दाखवताच त्यांना ओळख पटली. गोपाळचे आणि त्याचा मित्र यांचे भांडण झाले असल्याची माहिती नातेवाइकांना अगोदर मिळाली होती.