हजारो एकर भातशेतीचे नुकसान

By admin | Published: November 4, 2015 12:53 AM2015-11-04T00:53:56+5:302015-11-04T00:53:56+5:30

गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले

Thousands of acres paddy loss | हजारो एकर भातशेतीचे नुकसान

हजारो एकर भातशेतीचे नुकसान

Next

उरण : गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून दोन दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या दिवशीच बांध फुटून शेकडो एकर जमिनीत खाडीचे पाणी घुसले आहे. काही ठिकाणी शेतात कापलेली भाताची कणस पाण्यामुळे वाहून गेली तर काही भिजल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
उरण तालुक्यातील बेलोंडाखार, खोपटे खाडी, दादरपाडा मोठीजुई, हरिश्चंद्र कोटा, चिखली भोम तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे गावाजवळील खार बंदिस्ती या मोठ्या उधाणामुळे फुटली आहे. या खार बंदिस्तीची देखभाल करण्याची जबाबदारी ही खारलँण्ड विभाग आणि सिडकोकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षात खारलँण्ड विभागाने उरण भागात कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे केली नसल्यामुळे खार बंदिस्ती आणि उघाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या भरतीने सुद्धा या उघड्या आणि खार बंदिस्ती फुटून भरतीचे खारे पाणी शेतीत घुसते. खारे पाणी एकदा का शेतीत घुसले तर त्या शेतीत किमान चार वर्षे तरी पीक घेता येत नाही.काही ठिकाणी शेतकरी स्वत:च खार बंदिस्तीच्या दुरुस्तीची कामे करून खाडी किनाऱ्यावर मोठ्या मेहनतीने शेती करत आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या भरतीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे.
उरण पश्चिम विभागाची शेती बहुतांश सिडकोने संपादित केली असल्याने त्याची जबाबदारी सिडकोकडे येते. सिडकोने या भागात काही ठिकाणी खाडी किनारी उघाड्यांवर स्वयंचलित दरवाजे (प्लॅफ) बसविले आहेत. हे दरवाजे भरतीच्यावेळी आपोआप बंद होतात त्यामुळे भरतीचे पाणी नागरी भागात किंवा शेतीत घुसत नाही. मात्र गेल्या काही वर्षात हे फ्लॅफ खाडीच्या पाण्यानेकुजले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या फ्लॅफमधून पाणी नागरी वस्तीत किंवा शेतीत येते.
आॅगस्ट -२0१५ मध्ये उरण आणि पनवेल विभागातील खार बंदिस्तीच्या कामाबद्दल उरणचे आ. मनोहर भोईर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत बैठक घेऊन ओएनजीसी, सिडको आणि जेएनपीटी या कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून १५ किलोमीटरचे बंधारे बांधण्यास सांगितले होते आणि या कंपन्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले होते. मात्र त्या कामाबाबत कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)

कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान सुमारे ५.७ मीटर एवढी मोठी भरती आली होती. यामुळे अनेक ठिकाणी उघाड्यांच्या आणि बांधांच्या वरून हे पाणी शेतीत शिरले आहे. या शेतीचे तहसील आणि कृषी विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहेत. ज्या ठिकाणी बांध बंदिस्ती फुटली आहे तेथे रोजगार हमी योजनेअंतर्गत दुरुस्तीची कामे केली जाणार आहे.
- ए.एस.भारती, अभियंता, पेण खारलॅण्ड

खारलँण्ड विभाग आणि सिडकोच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी हे प्रकार घडतात. या विभागांनी खार बंदिस्ती दुरुस्तीची कामे वेळेवर हाती घेणे जरुरीचे आहे. तसेच अधिकाऱ्यांनी नुसते कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात काम करणे गरजेचे आहे.
- वैजनाथ ठाकूर, सदस्य, जिल्हा परिषद जासई

Web Title: Thousands of acres paddy loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.