योजनांमधील हजारो लाभार्थी अपात्र
By admin | Published: January 1, 2016 11:54 PM2016-01-01T23:54:21+5:302016-01-01T23:54:21+5:30
तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांमध्ये रोहा तालुक्यात
रोहा : तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांमध्ये रोहा तालुक्यात सुमारे ४,२०० लाभार्थी होते. या लाभार्थ्यांमध्ये अनेक लाभार्थी अपात्र असल्याची तक्रार होती. मागील सहा महिन्यांत सर्वेक्षण केले असता हजारो अपात्र लाभार्थी आढळून आले. या अपात्र लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य थांबविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. या सामाजिक सर्वेक्षणात सुमारे १,६०० अपात्र लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य बंद केल्याने सरकारच्या सुमारे १० लाख रुपयांची दरमहा रोहा तालुक्यात बचत होणार आहे.
रोहा तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांमध्ये अनेक अपात्र लाभार्थी मागील पाच ते १० वर्षे लाभ घेत होते. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत सर्वाधिक अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात अनेक लाभार्थी मयत झाल्याचे, तर काही लाभार्थी स्थलांतरित होऊनदेखील लाभ दिला जात असल्याचे निदर्शनास आले
होते.
काही लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच काही लाभार्थ्यांची मुले सज्ञान व कमावती झाल्याने अशा लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसाहाय्य थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गरजूंना लाभ व्हावा, हा शासनाचा मूळ उद्देश आहे. परंतुु रोहा तालुक्यात सुमारे १,६०० अपात्र लाभार्थी विविध योजनांमधून आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य बंद करून गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी शेकाप आ. पंडित पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाचे एकट्या रोहा तालुक्यात सुमारे १ कोटी रुपये वर्षाकाठी वाचणार आहेत. (वार्ताहर)