घारापुरीत महाशिवरात्रीसाठी हजारो शिवभक्त दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:51 AM2018-02-13T02:51:00+5:302018-02-13T02:51:51+5:30
देशात विविध १२ ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत. घारापुरी बेटावरील पुरातनकालीन चैतन्यमय आणि सजीव भासणारी १२ ज्योतिर्लिंगे अस्तित्वात आहेत. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात.
उरण : देशात विविध १२ ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत. घारापुरी बेटावरील पुरातनकालीन चैतन्यमय आणि सजीव भासणारी १२ ज्योतिर्लिंगे अस्तित्वात आहेत. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला ‘इंटरनॅशनल महाशिवरात्री’ म्हणूनही ओळखले जाते.
देशभरातील सोमनाथ, मल्लिकार्जुन, महांकाळेश्वर, अमलेश्वर, वैजनाथ, नागेश, काशिविश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, घृणेश्वर अशी १२ जोतिर्लिंगे ठिकठिकाणी अवतीर्ण झाली आहेत. शाश्वत म्हणून ओळखल्या जाणाºया या अद्भुत ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातूनच नव्हे, तर अगदी जगभरातूनही दरवर्षी कोट्यवधी शिवभक्त येतात.
मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेले बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रूपे असलेली अनेक प्रचंड शिल्पे आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्वर शिव, कल्याणमूर्ती, अंधकारसुरवध, गंगातारण शिव, योगीश्वर उमामहेश्वरमूर्ती आणि २० फूट उंच महेशमूर्ती आदी शिल्पांचा समावेश आहे.
राज्यभरात काही ठिकाणी असलेल्या शैवलेण्यांपेक्षा घारापुरी येथील लेण्या अगदी वेगळेपण दर्शवितात. पुरातन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या लेण्यांच्या गाभाºयातच प्रचंड आकाराचे पुरातनकालीन शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या चारही बाजूंना असलेल्या प्रवेशद्वारावरच प्रचंड आकाराचे द्वारपाल तैनात आहेत. प्रचंड आकार आणि घेराचे शिवलिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेते. या शिवलिंगाच्या बाजूलाच असलेल्या हौदाजवळ साधारत: दोन फूट उंच आणि दोन फूट रुंदीचे आणखी एक शिवलिंग आहे. मुख्य लेण्यांच्या पश्चिमेकडे दुसºया लेण्यांचे प्रवेशद्वार आहे. त्या लेण्यांच्या प्रवेशद्वारावरच अष्टमातृकांचे गाभार आहे.