रोजी गेली, तरी हजारो कुटुंबीयांना मिळणार रोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:17 AM2021-04-20T01:17:43+5:302021-04-20T04:29:48+5:30
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. पनवेल तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या शासनाच्या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. याकरिता शिधापत्रिकाधारकांनी आपल्या जवळील रास्त भाव धान्य दुकानदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून या योजनेचा लाभ घ्यावा. एप्रिल महिन्यात या योजनेअंतर्गत धान्याचे वाटपदेखील सुरू झाले आहे. ज्या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात या योजनेचा लाभ घेतला नाही,
अशा शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात या मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबाअंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. पालिका क्षेत्रातील ज्या कुटुंबियांचे उत्पन्न ६९ हजार व पालिका क्षेत्राबाहेरील ज्या कुटुंबियांचे उत्पन्न ४४ हजार आहे, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे. जे दुकानदार या योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यास टाळाटाळ करतील, अशा दुकानदारांची तक्रार तालुका पुरवठा अधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्याचे आवाहनदेखील शासनाने केले आहे.
काय मिळणार
तांदूळ आणि गहू या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबाअंतर्गत प्रतिव्यक्ती ५
किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे.
शासनाची योजना खरोखर लाभदायक आहे. मात्र या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना आहे. दुकानदारांकडून मोफत धान्य देण्यास टाळाटाळ केली गेल्यास त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.
- सुरेश लोंढे, लाभार्थी
शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार हिरावला गेला असल्याने मोफत धान्यामुळे लाभार्थी कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
- मोहन पाटील, लाभार्थी
लॉकडाऊन सुरू झाला आहे. दुकानदारांनी लवकरात लवकर या मोफत धान्यांचे वाटप करावे, जेणे करून गरजुंना या योजनेचा लाभ मिळेल.
- कुंदा शिंदे, लाभार्थी