जयंत धुळपअलिबाग : यंदा दिवाळीपर्यंत लांबलेला पाऊस आणि उधाणाच्या भरतीचे खारे पाणी तयार भात शेतीत घुसल्याने कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील ५ हजार शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे क्षेत्र आणि नुकसानग्रस्त शेतकरी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. सर्व पंचनामे प्राप्त झाल्यावरच नेमके नुकसानीचे क्षेत्र आणि नुकसानग्रस्त शेतकरी ही आकडेवारी स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय नियमानुसार हेक्टरी ७ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देण्यात येते; परंतु गतवर्षी जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान होऊन त्याचा फटका तब्बल ३० हजार शेतकºयांना बसला होता. मात्र, गतवर्षीच्या नुकसानभरपाईकरिता शासकीय निधीच आला नसल्याने अद्याप गतवर्षीची नुकसानभरपाई शेतकºयांना मिळाली नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. दरम्यान, यंदा १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती लागवड करण्यात आली आहे.
पनवेल परिसरात भातकापणी व झोडणीला वेग...पनवेल : लांबलेल्या पावसामुळे उशिरा का होईना भातकापणी आणि झोडणीला आता वेग आला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास संपल्यानंतर मळणीची कामे जोमाने सुरू आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी जोरदार पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. मात्र, आॅक्टोबरमध्ये पडलेल्या पावसाने काही प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. जोमदार लोंबी परतीचा पाऊस लांबल्यामुळे खाली कोसळल्या आणि शेतीची हानी झाली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तरीही मिळेल तेवढे पीक घरात आणण्यासाठी त्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी झोडणीची तसेच कापणीची कामे समुहाने सुरू आहेत. वास्तविक, दिवाळीपूर्वी भाताची कापणी आणि मळणी पूर्ण होत असते. या वर्षी मात्र सर्व सणांनी लवकर हजेरी लावल्याने आणि वाढीव पावसाने कापणी व त्यानंतरची कामे लांबली असल्याचे तालुक्यातील पळस्पे येथी शेतकरी चंद्रकांत भगत यांनी सांगितले. दरम्यान, कापणी, झोडणीची कामे सुरू झाल्याने डोंगरदरीत राहणाºया आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे.