कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:47 AM2020-03-07T00:47:37+5:302020-03-07T00:47:42+5:30
बँकांची शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने या बँकांविरोधात संपूर्ण कोकणभर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.
तळा : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित आहेत. शासन परिपत्रकाने शेतकरी संभ्रमात आहेत. अशातच बँकांची शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने या बँकांविरोधात संपूर्ण कोकणभर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शासन परिपत्रकातील ३० सप्टेंबर २०१९ या तारखेवरून शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकºयांकडील १ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यांत अल्प मुदत पीक खर्च ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासहित थकीत असलेली परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे, अशा शेतकºयांची अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल, असे शासन परिपत्रकात म्हटले आहे. मात्र दुसºया बाजूला शासन परिपत्रकातील ३० सप्टेंबर ही तारीख विचारात न घेता शेतकºयांकडून सक्तीची वसुली सुरू केली आहे. यामुळे शेतकरी जेरीस आला आहे असे बळीराजा संघटनेचे भास्कर गोळे यांनी सांगितले.
>तहसील कार्यालयांवर मोर्चा काढू - भास्कर गोळे
नैसर्गिक आपत्ती व कर्जाने खचलेल्या शेतकºयाला आधार देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना पुढे सरसावली असून शेतकºयांना बँकांनी वेठीस धरू नये अन्यथा सर्व बँकांविरोधात तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येईल. तसेच संपूर्ण कोकणभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गोळे यांनी दिला आहे. शासनाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखवू नये असे गोळे म्हणाले.