मधुकर ठाकूर उरण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उरण परिसरातील शेकडो एकर भातपिके पाण्याखाली गेली आहेत. हाती येण्याच्या तयारीत असलेल्या भातपिकाचा अवकाळी पावसामुळे चिखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
यंदा आवश्यकतेनुसार पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला चांगलेच फळ येऊन भातपीक चांगलेच फोफावले होते. तयार झालेले भातपीक हाती येण्याच्या तयारीत असतानाच निसर्गाच्या कोपाने डाव साधला. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार वादळी पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात कापणीसाठी तयार असलेली भातपिके आकंठ बुडाली आहेत. काही ठिकाणी तर भातपिकांचा चिखल झाला आहे. उरण परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच पाण्यात गेली आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.
नवी मुंबई शहरात ९० मिमी पावसाची नोंद
नवी मुंबई शहरात गेल्या तीन दिवसांपासून संध्याकाळी पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. नवी मुंबई शहरात मागील चोवीस तासांत सुमारे ९०.७४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, दररोज काही काळ कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांवर पाणी साचत आहे. गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी बेलापूर विभागात १४३.०६ मिमी, नेरूळ ११८.५० मिमी, वाशी विभागात ८८.६० मिमी, कोपरखैरणे ९२.३० मिमी तर ऐरोली विभागात ४०.०० मिमी पावसाची नोंद झाली.