मोबाइल चोरांकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:01 AM2019-06-11T02:01:57+5:302019-06-11T02:02:19+5:30
चार आरोपींना अटक : पनवेलमध्ये गुन्हे शाखेची कारवाई
पनवेल : पनवेल परिसरातील मोबाइल चोरी करणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखा २ च्या वतीने अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरलेले १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे १४ मोबाइल, १० हजार रुपयांचा लॅपटॉप व ३२ हजार रुपये असा एकूण १ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे नागरिक पुरते त्रस्त झाले होते. कारच्या काच फोडून मोबाइलची चोरी किंवा पादचाºयाच्या हातातील मोबाइल घेऊन चोर पसार होतात. कळंबोली येथे १४ मे रोजी दुकान फोडून चोरट्यांनी ८७ हजार रुपयांचे ११ मोबाइल चोरून नेले होते.
मोबाइल चोरीचे गुन्हे कळंबोली, तळोजा, खांदेश्वर, सानपाडा या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखा २ चे पोलीस शिपाई संजय पाटील, पोलीस हवालदार कानगुडे यांना मोबाइल चोरांबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले व त्यांच्या पथकाने सापळा लावून मोहम्मद असल्लम इब्राहिम खान (२४), मोहम्मद अश्रफ इब्राहिम खान (२०, दोन्ही रा. वावंजे), दिनेश गोपीनाथ गांगुर्डे (२०, रा. पडघे गाव), महमद तारीफ हुसेन अबुल हुसेन (रा. मुंबई) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तपासात चोरलेले १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे १४ मोबाइल, १० हजार रुपयांचा लॅपटॉप व ३२ हजार रुपये असा एकूण १ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. याशिवाय कळंबोली, तळोजा, खांदेश्वर, सानपाडा येथील चोरी, घरफोडी, जबरी चोरी सारखे एकूण ७ गुन्हे शिताफीने उघडकीस आणले आहेत.