मधुकर ठाकूर, उरण :उरण तालुक्यातील खोपटा,आवरे,पिरकोण, विंधणे,मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्या वरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतजमीनीत समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरल्याने हजारो एकर जमीन शेतजमीन नापीक झाली आहे.त्यामुळे खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने लवकरात लवकर बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी मनसेने केली आहे.
याप्रकरणी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्या दालनात गुरुवारी (३०) उरण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. उरण पुर्व विभागातील शेतकऱ्यांचे उपजिविकेच साधन भात शेती आहे.परंतु गेली अनेक वर्षे खाडीकिनाऱ्यांवर बांधबंदिस्तीची कामे न केल्याने तसेच करंजा बंदरात या अगोदर करण्यात आलेल्या दगड मातीच्या भरावामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी हे सातत्याने भात शेतीत शिरत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे उपजिविकेच साधन धोक्यात येत आहे.त्यानंतरही शासन पुन्हा एकदा करंजा बंदरातील १०० एकर जागेवर भराव टाकून मल्टिमाँडेल लाँजिस्टीक पार्क उभारण्याच्या तयारीत आहे .त्यामुळे खोपटा,आवरे,पिरकोण, विंधणे,मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भात शेतीत उधाणाचे पाणी शिरुन खारफुटीचे जंगल वाढण्याचा तसेच भातशेती नापीक होण्याचा संभव आहे.तरी आपण लवकरात लवकर सदर बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी उरणच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.याप्रसंगी केली.यावेळी खारभूमीचे उप अभियंता अतिश भोईर, पिरकोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य उपस्थित होते.
उरण तालुक्यात काही अंशी बांध दुरुस्तीची कामे सुरू आहेत.तसेच खोपटा परिसरातील खाडीकिनाऱ्या वरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत.परंतु निधी उपलब्ध झाल्यावरच टेंडर प्रक्रिया पार पडणार आहे.- विजय पाटील कार्यकारी अभियंता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण