केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात हजारो वाहनचालकांचा रास्तारोको; जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2024 06:20 PM2024-01-01T18:20:09+5:302024-01-01T18:20:27+5:30
जेएनपीए बंदरातील मालवाहतूक दिवसभर ठप्प
- मधुकर ठाकूर
उरण : केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी नव्याने तयार केलेल्या कायद्याविरोधात देशभरातील वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.कायद्याचा निषेध करण्यासाठी संतप्त झालेले शेकडो वाहनचालक सोमवारी (१) रस्त्यावरच उतरुन जेएनपीए परिसरातील कंटेनर वाहतूक काही काळ रोखुन ठेवली.पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांनी रोखुन ठेवलेले कंटेनर रस्त्याच्या कडेला उभी करण्यात यश आले असले तरी वाहनचालकांनीच वाहने चालविण्यासाठी नकार दिल्याने जेएनपीए बंदरातुन होणारी कंटेनर मालाची वाहतुक सकाळपासूनच ठप्प झाली आहे.त्यामुळे जेएनपीए परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
केंद्र सरकारने नव्याने तयार करण्यात आलेल्या कायद्यापासुनच देशभरातील वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा आणि इतर तरतूदी असलेल्या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात
देशभरातील संतप्त झालेले वाहनचालक आंदोलनाची भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरले आहेत.सोमवारी (१) जेएनपीए परिसरातील चांदणी चौक, धुतुम आदी विविध रस्त्यावर उतरून दूरवरून आलेले कंटेनर मालाचे ट्रेलर अडवून जेएनपीए बंदरात येजा करणाऱ्या वाहनांची थोपवून धरली.वाहनचालकांच्या या आंदोलनाला शेकडो वाहनचालकांनीही साथ दिली.यामुळे जेएनपीए अंतर्गत असलेल्या पाचही बंदरातील कंटेनर मालाची वाहतूक ठप्प झाली.कंटेनर वाहतूकच ठप्प झाल्याने सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत जेएनपीए बंदर परिसरातील विविध रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.
वाहन चालकांच्या आंदोलनामुळे जेएनपीए बंदरातील कंटेनर मालाची वाहतूकच ठप्प झाल्याने अखेर स्थानिक पोलिसांनी आंदोलनकर्त्यां वाहनचालकांशी संवाद साधला.वाहनचालकांची समजुत काढून कशीबशी रस्त्यावर अडथळ्यांसाठी उभे करण्यात आलेले कंटेनर मालाचे ट्रेलर रस्त्याच्या दुतर्फा जागी हलवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी न्हावा -शेवा बंदर पोलिस विभागाने शेकडो अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र सर्वच वाहनचालक आंदोलनात सहभागी झाल्याने जेएनपीए बंदरातील कंटेनर मालाची वाहतूक पुरती बंद पडली आहे.या आंदोलनाला बहुतांश वाहतूक संघटनांचा पाठिंबा दिला असून संघटनेच्याच आठ हजार कंटेनर ट्रेलर्सवर वाहनचालक नसल्याने वाहने विविध ठिकाणच्या रस्त्यांवर उभी करून ठेवण्यात आली असल्याची माहिती न्हावा -शेवा कंटेनर ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली. तर जेएनपीए बंदरातुन विविध संघटनांच्या माध्यमातून दररोज सुमारे २५ हजार कंटेनर ट्रेलर्स मालाची वाहतूक करतात.वाहनचालकांच्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असल्याने जेएनपीए बंदरात माल वाहतूक करणाऱ्या सुमारे २५ हजार वाहनांची चाके थांबली असल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेईकल ॲण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली.मात्र या उपरोक्तही जेएनपीए अंतर्गत बंदरातील कामकाजावर काही काळ वगळता कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा जेएनपीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.