खिळखिळ्या पुलांवर अजूनही दिला जातोय लाखो वाहनांचा भार!

By admin | Published: August 4, 2016 12:45 AM2016-08-04T00:45:02+5:302016-08-04T01:23:41+5:30

मुंबई-गोवा महामार्ग : स्वातंत्र्यापूर्वीची ब्रिटिश शासनाची भेट भारत सरकारने जपली ‘जीवापाड’

Thousands of vehicles are still loaded on the bridges! | खिळखिळ्या पुलांवर अजूनही दिला जातोय लाखो वाहनांचा भार!

खिळखिळ्या पुलांवर अजूनही दिला जातोय लाखो वाहनांचा भार!

Next

विहार तेंडुलकर-- रत्नागिरी --महाडनजीक झालेल्या मुंबई - गोवा महामार्गावरील दुर्घटनेनंतर आता ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न पुढे आला आहे. या पुलांची मुदत संपली असल्याबाबत ब्रिटिश शासनाकडून वारंवार ‘रिमार्इंडर’ येत असतानाही शासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने ही स्थिती उद्भवली आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या रुंद-अरूंद पुलावरून अद्याप वाहतूक सुरुच आहे. याबाबत शासन गंभीर कधी होणार? असा प्रश्न आता केला जात आहे.
महाडनजीक सावित्री नदीवरील पूल अचानक कोसळल्याने दोन बसेस वाहून गेल्या. त्याबरोबरच अन्य वाहनेही बेपत्ता झाली आहेत. जो पूल कोसळला, त्या पुलाचे मे महिन्यातच परीक्षण करण्यात आले होते आणि तो पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचा अहवाल शासनाला देण्यात आला होता. पूल सुस्थितीत असताना तो कोसळला कसा? यावरून आता वादंग सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलांची ‘सुस्थिती’ही चव्हाट्यावर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा वर्दळीचा आणि सर्वांत महत्त्वाचा महामार्ग असतानाही आतापर्यंत सत्तेवर असलेल्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी या महामार्गाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे महामार्ग अक्षरश: खिळखिळा झाला आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा विषयही गेली वीस वर्षे चर्चेत आहे. आजही तो प्रश्न मिटलेला नाही. त्यातच गेल्या काही वर्षात महामार्गावर अवजड वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. लहान वाहनांची संख्याही वाढल्याने महामार्ग कायम ‘बिझी’ असतो. ब्रिटिश सरकारने उभारलेले हे पूल इतक्या वर्षांनंतरही सेवा बजावताना दिसत आहेत. मात्र, ब्रिटिशांनी हे पूल उभारताना त्यावेळच्या वाहतुकीचा अंदाज घेऊन ते उभारले आहेत. हे सर्व पूल पूर्वी १० टनी वाहतुकीसाठीच बांधण्यात आले होते. परंतु, आजची स्थिती पाहता मिनिटाला ४० ते ५५ छोटी मोठी वाहने तसेच आधुनिक व शक्तिशाली कंटेनर या पुलावरून जात आहेत. त्यातील अनेक पूल कमकुवत आहेतच; शिवाय अरूंदही आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे आणि त्याबरोबरच वाहतूककोंडीचे प्रकारही होत आहेत. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.
केंद्रातील रस्ते आणि वाहतूक खाते नितीन गडकरी यांच्याकडे आल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचा मुद्दा वेगाने पुढे सरकला आणि अनेक पुलांची कामे पूर्णत्त्वाकडे गेली. मात्र, त्या पुलांना जोडरस्ता अजूनही नसल्याने ते विनावापरच पडून आहेत. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतरच पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ पूल आहेत. हे पूल लांबीने जास्त आहेत. मात्र, अरूंद आहेत. त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. काही पुलांचे रेलिंग तुटले आहेत, तर काहींचे पिलर सुटत चालले आहेत. या स्थितीतही या पुलांवरुन अवजड वाहतूक सुरु आहे.

सर्व पूल सुस्थितीत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील या पुलांचे आताचे वय हे कमीत कमी ४८ वर्षे आणि जास्तीत जास्त २०० वर्षे एवढे आहे. खारेपाटणचा पूल हा १७४६चा आहे आणि या सर्व पुलांचा शासनदरबारी ‘पूल सुस्थितीत’ असा रिपोर्ट आहे, हे विशेष!
ब्रिटिशांनाच काळजी!
पुलांविषयी ब्रिटिश शासनाने भारत सरकारशी पत्रव्यवहार केला आणि या पुलांवरून वाहतूक करू नये, अशी विनंती केली. वाशिष्ठी नदीवरील पुलाबाबत ब्रिटिश शासनाने कळवले होते. या कोणत्याच पत्राची भारत सरकारने दखल घेतलेली नाही.


चर्चा होते अन्...!
महामार्ग आणि पुलामुळे झालेला अपघात या काही आजच्या घटना नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीवरील अरुंद पुलावरून १९ मार्चला पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास महाकाली ट्रॅव्हल्सची बस कोसळून ३७ जण ठार, तर १५ जखमी झाले होते. त्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावर विधानसभेत चर्चाही झाली आणि हवेतच विरली.


रत्नागिरी - जगबुडी, ता. खेड (१९३१), वाशिष्ठी, ता. चिपळूण (१९४३), वाशिष्ठी नदीवरील दुसरा पूल (१९४३), गडनदी आरवली पूल, ता. संगमेश्वर (१९३२), शास्त्री पूल, ता. संगमेश्वर (१९३९), सोनवी पूल, ता. संगमेश्वर (१९३९), सप्तलिंगी पूल, ता. संगमेश्वर (१९७९), बावनदी, ता. संगमेश्वर (१९२५), काजळी नदी आंजणारी पूल, ता. लांजा (१९३१), मुचकुंदीवरील वाकेड पूल, ता. लांजा (१९३१), अर्जुना नदीवरील पूल, ता. राजापूर (१९४४).
सिंधुदुर्ग - खारेपाटण पूल (१७४६-४७), पियाळी नदीवरील पूल, ता. कणकवली (१९४१), वेळणा नदी, ता. कणकवली (१९६१), जानवली पूल, ता. कणकवली (१९३४), गडनदी, ता. कणकवली (१९३४), कसाल नदीवरील पूल, ता. कुडाळ (१९३४), पिठढवळ नदीवरील पूल, ता. कुडाळ (१९५७), वेताळ बांबर्डे पूल, ता. कुडाळ (१९३८), भंगसाळ पूल, ता. कुडाळ (१९६८), बांदा पूल, ता. सावंतवाडी (१९५८).


अपघातांची मालिका
मुंबई - गोवा महामार्ग हा महाराष्ट्रात ६0९ एवढ्या किमीचा आहे. या महामार्गावर दरवर्षी सरासरी एक हजार लोकांचा अपघाती मृत्यू होतोे. महामार्ग वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, २०१३ ते २०१५दरम्यान ३ हजार ३५८ अपघात महामार्गावर झाले. २०१३मध्ये १ हजार १८६ मोठे अपघात झाले. त्यामध्ये २०१ जणांचा मृत्यू झाला. २०१४मध्ये महामार्गावर १०८४ अपघात झाले त्यामध्ये २०५ जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी १ हजार ८८ अपघातात १७४ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Thousands of vehicles are still loaded on the bridges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.