नोकरीच्या बहाण्याने तरुणांची कोट्यवधींची फसवणूक, पोयनाडसह पेणमध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:53 PM2019-05-12T23:53:02+5:302019-05-12T23:53:10+5:30
रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील २०० पेक्षा अधिक तरुणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-जयंत धुळप
अलिबाग : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील २०० पेक्षा अधिक तरुणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २८ मार्च रोजी प्रसिद्ध केल्यावर फसवणूक झालेले तरुण पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू लागले.
पेण पोलीस ठाण्यात याच फसवणूक प्रकरणात शुक्रवारी विनोद पाटील या तरुणाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पेणमधील पिंपळपाडा येथील शशिकांत रामदास पाटील यास अटक केली. त्यास न्यायालयाने सोमवार, १३ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पेण पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ यांनी दिली.
२८ डिसेंबर २०१७ रोजी पिंपळपाडा(पेण) येथे शशिकांत रामदास पाटील (पिंपळपाडा, ता.पेण), कृष्णकांत विद्याधर पाटील (भाल, ता.पेण) आणि सचिन जगन्नाथ पाटील (रा.कुरकुंडी कोलटेबी, ता.अलिबाग) या तिघांनी रेल्वेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तसेच बनावट मुलाखत पत्र, कार्यालयीन आदेश आणि नियुक्ती पत्र देऊन विनोद पाटील (रा.पिंपळपाडा,ता.पेण) यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये, ऋषिकेश परशुराम पाटील (रा. पिंपळपाडा पो. कोप्रोली, ता.पेण) यांच्याकडून ३ लाख, प्रणित रमेश म्हात्रे (रा. फ्लॅट क्र. १३ विष्णू नगर पेण) यांच्याकडून १० लाख आणि रोहन चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून ३ लाख असे मिळून एकूण २३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून शशिकांत रामदास पाटील (पिंपळपाडा, ता.पेण) यास पेण पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तर कृष्णकांत विद्याधर पाटील आणि सचिन जगन्नाथ पाटील यांचा शोध पेण पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ हे घेत आहेत. दरम्यान, तिघांना आम्ही पैसे देताना त्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले असून ती सी.डी. पुरावा म्हणून पेण पोलिसांना सादर केली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.
पोयनाडमध्ये ४५ तरुणांची २ कोटी ९० लाख ९५ हजारांची फसवणूक
पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणारे सचिन जगन्नाथ पाटील यांनी फसवणूक करणाºया या सहा जणांमध्ये गोविंद शिवाजी शिर्के (रा.कामोठे,नवी मुंबई), वनिता डी.गोरे, ब्रिजेश मिश्रा (दोन्ही रा.बोरीवली,मुंबई), अनिल पाटील, देवांग चुरी (रा.चर्चगेट,मुंबई) आणि जीवन पाटील (रा.उरण) यांचा समावेश असल्याची माहिती दिली.
फसवणूक झालेल्या एकूण तरुणांपैकी ४५ बेरोजगार तरुणांच्या वतीने आपण ही फिर्याद दाखल करीत असल्याचे नमूद केले आहे. फसवणूक झालेल्या ४५ तरुणांची तब्बल २ कोटी ९० लाख ९५ हजारांची ९ आॅक्टोबर २०१६ ते २५ मार्च २०१९ या सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत फसवणूक झाल्याचे पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत नमूद आहे.