पेण : आज देशात परिवर्तनाची लाट आली आहे. ती सरकारविरोधात आहे. या लाटेत तुम्ही सर्वांनी सहभागी होऊन या धर्मांध शक्तींविरोधात लढण्याची ताकद उभी करा. देशाच्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे. संविधान वाचविण्याचा हक्क अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. तेव्हा या परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.पेण येथे सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सभा पेण महात्मा गांधी मंदिराच्या समोरील प्रांगणात पार पडली. कोल्हे यांनी रोखठोक भाषणात मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेताना २०१४ च्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने गेली कुठे असा सवाल करीत मोदी सरकारचे वाभाडे काढले. शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी राज्य केले. आज देशात काय परिस्थिती दिसत आहे ते पाहा. रोजगाराच्या शोधात युवकांना भटकंती करावी लागत आहे. विकासाचे मुद्दे गायब झाले. आता भावनिक आवाहन करण्यात तुमचा दम निघत आहे. पण देशाची जनता सुज्ञ आहे. तिला सारे समजते आहे. दगड भिरकावणारा युवा रायगडच्या मातीत नाही तर तो दगड रचून इतिहास घडविणारा आहे. २०१९ मध्ये मोदी सरकार आले तर देशात पुन्हा निवडणूक होणार नाही. म्हणजे काय तर देशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवण्याची यांची तयारी आहे. हे सर्व बदलण्यासाठी मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे. छपन्न इंचाच्या छातीची भाषा करणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइकसह या जवानांच्या बलिदानावर राजकारण चालत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची ठेव आहे. तीच विचारधारा लढाई जिंकेल. आपण हे सत्य नाकारू शकत नाही.तेव्हा मायबाप जनता जनार्दनांनो सावधान. घटिका जवळ आली आहे. या सरकारला कायम हद्दपार करू या आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.या वेळी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे, शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जयंत पाटील, आ.धैर्यशील पाटील, बाळाजीशेठ म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे शैलेश चव्हाण, काँग्रेस पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल आदींसह शेकाप, काँगे्रस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.
देशातील स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात - डॉ. अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:59 AM