खवले मांजराची तस्करी करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:13 AM2021-02-10T01:13:42+5:302021-02-10T01:13:49+5:30
वनविभागाची कशेडी घाटात कारवाई; भोगाव खुर्द गावाच्या हद्दीत पकडले
महाड\दासगाव : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक खवले मांजर आणि एक रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. रोहा वनविभागाने ही कारवाई केली आहे.
कशेडी घाटातून एका रिक्षातून खवले मांजर नेण्यात येत असल्याची माहिती रोह्याचे सहायक वन संरक्षक विश्वजीत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहन चालक राजेश लोखंडे यांनी कशेडी घाटान भोगाव खुर्द गावाच्या हद्दीत तपासणी सुरू केली. त्यावेळेस एम.एच.०८ एक्यू ४४४१ या क्रमांकाच्या रिक्षामध्ये हे खवले मांजर आढळून आले. रिक्षातील सागर श्रीकृष्ण शिर्के (रा. चिवेली,ता. चिपळूण), सिकंदर साबळे (रा. वाघिवडे, ता.चिपळूण) या दोघांसह रिक्षा चालक-मालक नरेश प्रकाश कदम (रा. कानुस्ते, ता. चिपळूण) या तिघांना वन विभागाने या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत महाड वनपरिक्षेत्राचे वनरक्षक शरद धायगुडे, संदीप परदेशी, रोहिदास पाटील, प्रकाश पवार, गौतम इहावळे, जंगम मेजर, मच्छिंद्र देवरे, प्रकाश जाधव, नवनाथ मेटकरी यांचेही सहकार्य लाभले. अधिक तपास सहायक वनसंरक्षक रोहा हे करीत आहेत.