राजापुरी बंदर परिसरात तीन होड्यांना आग; मच्छीमार जाळीही खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 10:51 PM2020-03-12T22:51:24+5:302020-03-12T22:52:51+5:30
चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती
आगरदांडा : मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राजापुरी बंदराजवळ दुरुस्तीसाठी बोटी किनाºयावर उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र यातील तीन बोटींना तसेच मच्छीमार जाळ्यांना आग लागून तब्बल ३७,२८,००० रुपयांचे नुकसान झाल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
राजापुरी बंदराजवळ ‘सागरकन्या’, ‘जयवंती’, ‘धनसागर’ या तीन बोटी नादुरुस्त झाल्याने दुरस्तीकरिता किनाºयावर आणल्या होत्या. त्या तीनही होड्यांना व बाजूला असणारे जाळे यांना बुधवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास अचानक आग लागली. यात बोटी, जाळी खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
मुरूड राजापुरी ग्रामपंचायत हद्दीत राहणारे पद्मा बाळोजी दिघीकर यांच्या नावावर असणारी ‘सागरकन्या’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर आणली होती. दुरुस्तीचे काम सुरू असताना, मध्यरात्री अचानक आग लागल्याने तब्बल ७,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बोटीच्या बाजूला गोविंद केशव मढवी यांची ‘जयवंती’ ही दोन सिलिंडरची बोट दुरुस्तीकरिता आणली होती. ही बोटही खाक झाल्याने २,६८,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती. त्याच दरम्यान त्या बोटीला आग लागून ५,००,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
या सर्व बोटींच्या खालच्या बाजूस जयेश गजानन भटीकर, चंद्रकांत पद्मा मोनाक, चिंतामण पांडुरंग बाणकोटकर, विलास पद्मा मोनाक, दामोदर रामचंद्र बाणकोटकर, दीनानाथ चांग्या नागुटकर, प्रकाश मधुकर मोने, भास्कर बाळोजी कुडगावकर, गुरूदास चांग्या नागुटकर, हेमंत लक्ष्मण आंबटकर, प्रदीप रामचंद्र पाटील याची मासेमारीसाठी वापरण्यात येणारी निरनिराळी जाळीही आगीत भस्मसात झाली आहेत.
रात्रीची वेळ असल्याने किती ग्रामस्थांचे नुकसान झाले, हे नेमके समजले नसून आकडा वाढण्याची शक्यता आहे. महादेव दिघीकर यांनी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार तपास करीत आहेत. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने अवघ्या काही मिनिटांत तीन बोटी आणि लाखो रुपये किमतीची जाळी भस्मसात झाली.