कर्जत : तालुक्यातील मोरेवाडी येथील एका दीड वर्षाच्या कुपोषित बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जतमधील दुर्गम भागात पोषण आहार वाटपात नियमितता नाही. त्यामुळे तालुक्यातील स्थिती गंभीर झाली असून, कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. गेल्या दीड वर्षात दुसरे बालक कुपोषणाचे बळी ठरले आहे.कर्जत तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असून, गेल्या काही वर्षांपासून कुपोषणामुळे तालुका चर्चेत आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी प्रसंगी राज्य सरकारला बाल उपचार केंद्रे सुरू करावी लागली होती. त्याच वेळी विशेष पोषण आहारदेखील कुपोषण दूर करण्यासाठी सुरू करावा लागला होता. असे असताना मोरेवाडी येथील १८ महिन्यांची सोनाली भास्कर पादिर या बालिकेचा शुक्रवार, २० आॅक्टोबर रोजी कुपोषणाने मृत्यू झाला.गेल्या महिन्यात राज्यात सुरू असलेला अंगणवाडीसेविकांच्या संपामुळे मोरेवाडीमध्ये कुपोषणाचा बळी गेला. सोनाली या दीड वर्षाच्या मुलीचे वजन जेमतेम दीड किलो होते. त्या बलिकेचे नाव कुपोषित बालकांच्या कमी वजनाच्या यादीत होते. मात्र, त्या बालिकेचे वजन कमी असताना, कर्जत तालुका एकात्मिक बालविकास विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप तिच्या पालकांकडून होत आहे.मोरेवाडीतील अंगणवाडी सेविका वैशाली वारे यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला आहे, तर तेथील अंगणवाडी मदतनीस या रजेवर असल्याने, येथील १७ लहान बालके अंगणवाडीतील पोषण आहार आणि अन्य सोईसुविधापासून वंचित राहिली. त्यामुळे २० आॅक्टोबर रोजी सोनाली पादिर या दीड वर्षाच्या बलिकेचा मृत्यू कुपोषणाने झाला असून, तेथील आणखी चार बालके मृत्यूच्या छायेत आहेत. अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांची गैरहजेरीमुळे मोरेवाडी अंगणवाडी केवळ नावापुरती उरली आहे. तेथे अंगणवाडी बालकांना घरी पोषण आहार दिला जात असून, त्यातील अनियमतिता असल्याने कुपोषण वाढत आहे. सोनालीच्या मृत्यूची माहिती मिळताच, एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवार यांनी आपल्या कार्यालयातील पर्यवेक्षिका ए. जी. तांबे आणि ताडवाडी येथील अंगणवाडीसेविका यांना तातडीने मोरेवाडी येथे पाठविले आणि संबंधित घटनेची, तसेच परिसरातील अन्य कुपोषित बालकांची माहिती घेण्यास सांगितले.
कर्जत तालुक्यातील मोरेवाडीत कुपोषित बालकाचा मृत्यू, पोषण आहाराअभावी तीन बालके अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:23 AM