वासांबे मोहोपाडा परिसरात तीन दिवसांचा कडक जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:22 PM2021-04-29T23:22:18+5:302021-04-29T23:22:18+5:30
मोहोपाडा : वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांत ...
मोहोपाडा : वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांत बेड शिल्लक नसून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी रसायनी परिसरातील मोहोपाडा नवीन पोसरी, रिस, चांभार्ली या बाजारपेठा शुक्रवार, ३० एप्रिल ते २ मेपर्यंत पूर्णत: बंद करून परिसरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना नागरिक तरीदेखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुक्तसंचार करताना दिसत आहेत. यामुळेच रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येते. नागरिकांचा हा बिनधास्तपणा त्यांच्या आरोग्यावर बेतू शकतो. याचे कोणालाही भान नसल्याने मोहोपाडा बाजारपेठेत सकाळी अकरा वाजेपर्यंत तुफान गर्दी होत आहे. यामुळे पोलीस यंत्रणेलाही अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली होती. त्यापेक्षा दुसऱ्या लाटेत वासांबे मोहोपाडा परिसरात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय आहे. कोरोनाला परिसरातून हद्दपार करण्यासाठी वासांबे मोहोपाडा परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळ, ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन, पत्रकार, स्वच्छता कमिटी यांनी नवीन पोसरी हनुमान मंदिरात चर्चा बैठक घेतली होती. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी, तसेच पत्रकार यांनी जनता कर्फ्यू लावावा, अशी मागणी केली होती. यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा मोहोपाडा शिवाजी चौकात चर्चा करून सर्वानुमते ठरविण्यात आले. वासांबे मोहोपाडा परिसरात तीन दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लावला असून, तो शुक्रवार, ३० एप्रिल ते २ मे पर्यंत राहणार आहे. याबाबत गुरुवारी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने स्पिकर लावून परिसरात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले.