बैलगाडी शर्यत अपघातात तिघे जखमी; प्रेक्षकांची पळापळ, गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:00 PM2022-02-03T19:00:01+5:302022-02-03T19:00:41+5:30
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग -रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्पर्धे दरम्यान, अचानक बैल उधळले आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये बैलगाडी घुसली. त्यानंतर एकच गोंधळ झाला. प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यानंतर याबाबतचे व्हि़डीआे साेशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव समुद्रकिनारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मागील 5 ते 6 वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. आता बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैल गाडीवान आणि शौकिनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, हा उत्साह आता जिवावर बेतला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.