भरधाव ट्रकच्या धडकेत रायगडमध्ये तीन ठार, आठ जणांना उडवले; एक अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:00 AM2021-04-01T07:00:26+5:302021-04-01T07:00:49+5:30
रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे.
रोहा/ धाटाव : रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे. प्राथमिक माहितीनुसार, चार जण जखमी आहेत.
या ट्रक चालकाने साळाव, आमली येथे प्रत्येकी एकाला, तर चेहेर येथे दोन पादचाऱ्यांना ठोकर मारून जखमी केले. त्यानंतर, हा ट्रक रोह्याच्या दिशेने निघाला. तोपर्यंत पुढील गावात या घटनेची माहिती मिळाल्याने स्थानिकांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अनेक गाड्या व अडथळे उडवले. त्यानंतर, न्हावे फाटानजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले. यात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला असून, त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. ही धडक इतकी जोरात होती की, संबंधित शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून, गाडी सुमारे चारशे मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यानंतर, चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे याला ठोकरल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या चालकाला चांडगावनजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.